मुंबई- प्रेक्षकसंख्या वाढविण्यासाठी गैरप्रकार करणाऱ्या वाहिन्यांवर कारवाई झालीच पाहिजे , मात्र या वाहिन्यांच्या आडून भाजपवर टीका करणारे काँग्रेस प्रवक्ते आपल्या भविष्यकाळातील पराभवासाठीच्या सबबी शोधत असावेत. महाविकास आघाडी सरकारला सर्व स्तरांवर आलेले अपयश झाकण्यासाठी या कारवाईचा वापर केला जात आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी केली आहे.
पाठक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, काँग्रेसने गेल्या पाच सहा वर्षांत ईव्हीएम, निवडणूक आयोग यांच्यावर आपल्या पराभवाचे खापर फोडले आहे. जनतेने आपल्याला नाकारले हे खुल्या दिलाने मान्य करण्याऐवजी काँग्रेस नेतृत्व मतदान यंत्रे , निवडणूक आयोग यांच्यावर दोषारोप केले आहेत. पूर्वी पराभवानंतर मतदान यंत्रे , निवडणूक आयोग वगैरेंवर खापर फोडले जायचे. आता निवडणुकांपूर्वीच निमित्त शोधण्याचा प्रकार चालू आहे. आता काही माध्यमांवर झालेल्या कारवाईच्या निमित्ताने भाजपा ला लक्ष्य करण्याचा काँग्रेस नेतृत्वाचा प्रयत्न म्हणजे ‘ आग रामेश्वरी , बंब सोमेश्वरी ‘ असाच प्रकार आहे.
मतदार मोदी सरकारविरुद्धच्या अशा अपप्रचाराला थारा देत नाहीत हे 2019 च्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. राफेल विमानांच्या खरेदीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चिखलफेक केली . मात्र मतदारांनी 2014 पेक्षाही अधिक जागा देऊन काँग्रेसला सणसणीत चपराक लगावली होती , याचा काँग्रेसला विसर पडलेला दिसतो आहे. देशात घडलेल्या कोणत्याही घटनेला भाजपाला जबाबदार धरण्याऐवजी मतदार आपल्याला वारंवार का नाकारतात याचे आत्मपरिक्षण काँग्रेसने करावे असेही पाठक यांनी पत्रकात नमूद केले आहे.
राज्यातील महाविकास आघाडीला वेगवेगळया आघाड्यांवर आलेले अपयश झाकण्यासाठी या कारवाईचा वापर केला जात असावा अशी शंका घेण्यास जागा आहे. अन्यथा मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्रकार परिषद घेऊन आपली कार्यक्षमता जगजाहीर करण्यास सांगण्याचे काहीच कारण नव्हते, असेही श्री . पाठक यांनी पत्रकात नमूद केले आहे.
एखादी वाहिनी गैरप्रकार करून आपली प्रेक्षकसंख्या फुगवून दाखवीत असेल तर त्या वाहिन्यांवर कारवाई करणे समर्थनीयच आहे. भाजपा अशा गैरप्रकारांना कदापी पाठीशी घालणार नाही. मात्र राजकीय सूडबुद्धीने एखाद्या वाहिनीला लक्ष्य केले जात असेल तर त्याला भाजपा जोरदार विरोध करेल. महाराष्ट्रातील सत्तारूढ पक्षांना अडचणीच्या ठरतील अशा बातम्या प्रसारित केल्या म्हणून दूरचित्रवाणी वाहिन्यांना काही ना काही निमित्ताने कोंडीत पकडले जात असेल तर ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ठरेल, असेही पाठक यांनी पत्रकात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- भीमा-कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा ISI च्या संपर्कात होते, NIA चा दावा
- सरकारी तिजोरीला 61 कोटींचा गंडा घालणाऱ्या निर्यातदार कंपन्यांचा DGGI कडून पर्दाफाश
- ‘हे’ राज्य ठरले प्रत्येक ग्रामीण घरांना नळजोडणी देणारे पहिले राज्य
- मालवाहतुक अभियान : रेल्वेच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या उत्पन्नात होतेय भरघोस वाढ
- ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

