टीम महाराष्ट्र देशा : गेल्या चार दिवसांपासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं आहे. मंगळवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास ही घटना घडली असून यात २३ ते २५ जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तर विरोधकांनी या घटनेवरून सत्ताधरऱ्यांना धारेवर धरले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत गिरीश महाजनांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, तिवरे धरण दुर्घटना ही सरकारच्या लापरावाईचे उदाहरण आहे. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सरकार जबाबदार आहे. त्यामुळे फडणवीस सरकारवर ३०२अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने धरणाचे बांधकाम केले होते. आमदार आणि कंपनीवर लागलीच गुन्हा दाखल करावा. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घडलेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारत मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. सत्ताधाऱ्यांनो! जागे व्हा असे त्यांनी ट्विट केले आहे.
दरम्यान गावकऱ्यांनी धरण फुटल्याची, गळत असल्याची तक्रार केली होती. जलसंपदा खात्यांतर्गत हे धरण येत असल्याने दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या. अधिकाऱ्यांनीही दुरुस्ती केली असं उत्तर दिलं होतं. परंतु आता या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

