बीड :लोकसंख्येच्या तुलनेत समाजाला आरक्षणाचा टक्का कमी आहे. परिणामी समाजाचे नुकसान होत आहे. समाजाला वाढीव आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बुधवारी (ता. २८) वंजारी समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.यावेळी एकच मिशन वंजारी आरक्षण आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.समाजाला वाढीव आरक्षण मिळावे या मागणीसाठी कृती समितीने मागच्या काही दिवसांत समाजात बैठका घेऊन जनजागृती केली. या मागणीचे निवेदन सोमवारी मुख्यमंत्र्यांनाही देण्यात आले.
दरम्यान आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, एकच मिशन वंजारी आरक्षण असा मजकूर लिहलेले फलक आणि टोप्या घालून समाज बांधव सहभागी झाले होते. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलींची भाषणे झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महिलांचाही मोर्चात मोठा सहभाग होता.


