औरंगाबाद : शहरात दररोज दिड हजारांच्या घरात रुग्णसंख्या निघत आहे. त्यामुळे बेड्सची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने शासन निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात ३१ मंगल कार्यालये ताब्यात घेतली आहेत. या मंगल कार्यालयांत कोविड केअर सेंटर सुरु केले जाणार असून येत्या तीन दिवसात हे सेंटर्स सुरु करण्याचे नियोजन प्रशासन करत आहे. ३१ मंगल कार्यालयांमधून तब्बल २ हजार बेड्सची व्यवस्था केली जात आहे. यामुळे शहरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात दररोज दिड हजारपेक्षा अधिक रुग्ण निघत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. गतवर्षी ज्या इमारती क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरल्या जात होत्या त्या इमारती यंदा कोविड केअर सेंटर म्हणून वापरल्या जात आहेत. मात्र तरीही कोविड केअर सेंटरची संख्या आणि वाढते रुग्ण यांच्या मोठी तफावत निर्माण झाल्याने आता कोविड केअर सेंटरसाठी मंगल कार्यालये ताब्यात घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.
यासाठी साठ मंगल कार्यालयांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३१ मंगल कार्यालये ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, पहिल्या टप्प्यात ३१ मंगल कार्यालये ताब्यात घेतली जात आहेत. ही कार्यालये ताब्यात घेण्यासाठी त्या त्या प्रभाग अधिकार्यांना पत्र दिले आहे.
आज ही मंगल कार्यालये ताब्यात घेतली जातील. त्यानंतर तेथे आवश्यक त्या सुविधा उभ्या करून कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे नियोजन आहे. या ३१ मंगल कार्यालयात नव्याने तयार केल्या जाणार्या कोविड केअर सेंटर्ससाठी पाच हजार पलंग खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार पलंग खरेदी करण्याचे आदेश भांडार विभागाला दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- जितेंद्र आव्हाडांच्या बोलण्यात तथ्य नाही, कोणताही आमदार एवढा कमकुवत नसतो – दरेकर
- जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांची जमली गट्टी
- वेळ पडल्यास सरकारने देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करावी; नाना पटोले यांची मागणी
- आता राज्यव्यापी लॉकडाऊन करता येणार नाही, मात्र…केंद्र सरकारची नवी नियमावली
- वाझेंचा देशपातळीवरील मोठा गुन्हा; एनआयएने आणखी १५ दिवसांची कोठडी मागितली

