टीम महाराष्ट्र देशा – मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशींविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा निघणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर ते आझाद मैदानावरील सभेला संबोधित करतील.
तसेच नागरिकत्व कायदा दुरुस्ती आणि राष्ट्रीय नागरिक सूची वरून देशभरात वादंग सुरू असताना ठाकरे यांनी बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची भूमिका घेतली आहे आणि हिंदुत्वाची कास धरली आहे. राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका घेतली असल्याने भाजप-मनसे जवळीक वाढत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, या मोर्चात सहभागी होण्यासाठी नाशिक शहरातून मनसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. नाशिकहून मुंबईला निघण्यापूर्वी मखमलाबाद नाका परिसरातील हनुमान मंदिरात मनसैनिकांनी दर्शन घेतले. तसेच, वाहनांना मनसेचे भगवे झेंडे आणि होर्डिंग्स लावण्यात आले आहेत.
आता स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांच्या मुंबईतील मोर्चाला पाठिंबा दिला आहे . मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुकारलेल्या मोर्चाची मागणी बाहेरच्या देशातील घुसखोरांना हाकलून द्या एवढीच असेल, तर आमचा राज ठाकरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, असं मत राजू शेट्टी यांनी औरंगाबादमध्ये बोलत व्यक्त केलं.
शेट्टी म्हणाले, “बाहेरच्या देशातून जे घुसखोर येतात त्याचं समर्थन कुणीही करणार नाही. आम्हीही करत नाही. त्यामुळे बाहेरच्या अवैध घुसखोरांना हुसकाऊन लावा इतकी राज ठाकरेच्या मोर्चाची मागणी असेल, तर आमचा त्याला पाठिंबा आहे. परंतु केंद्र सरकार आज नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि एनपीआरच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत आहे. सीएए हा तर सरळसरळ संविधानाच्या विरोधातील कायदा आहे.”
शेट्टी पुढे म्हणाले, ‘संविधानाने या देशात जात, धर्म, लिंग आणि पंथ या आधारावर कोणत्याही व्यक्तीसोबत भेदभाव केला जाणार नाही, असं आश्वासन दिलं आहे. सीएए कायदा या आश्वासनाला हरताळ फासणारा आहे. एनआरसीमध्ये जवळपास ४० टक्के लोकांना आपला जन्माचा पुरावाच देणं अशक्य आहे.
माझंच उदाहरण सांगतो. ५२ वर्षांपूर्वी माझा जन्म माझ्या घरातच झाला. हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झालेला नाही. त्यामुळे माझा स्वतःचाच जन्माचा दाखला नाही. मी दोनवेळा खासदार, एकदा आमदार आणि एकदा जिल्हा परिषद सदस्य होतो. माझ्यासारख्याची अशी अवस्था असेल, तर सर्वसामान्य जनतेचं काय आहे, असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

