मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी उद्या देशभरात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या मतदानासाठी सर्व मतदारांनी पुढे यावे; मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून आपली लोकशाही अधिक मजबूत करा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्यक्ती एक मूल्य अशी राजकीय समता आणली आहे. मतदानाचा समान अधिकार देऊन देशात लोकशाही अधिक मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सोपविली आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून त्याचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
दरम्यान, देशात चांगल्या मजबूत आणि स्थिर सरकारसाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार ला पुन्हा संधी देणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्रात महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतदानाने निवडून देण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
राज्यात आंबेडकरी जनतेचे मतदान निर्णायक असून हे मतदान ज्यांच्या बाजूने जाईल, विजय त्यांनाच मिळेल असा अनुभव असून यंदाच्या निवडणुकीतही आंबेडकरी जनतेचे मतदान महायुतीच्या उमेदवारांना मिळेल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले हे उद्या सोमवार दि. २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बांद्रा येथील नवजीवन शाळेच्या मतदान केंद्रात मतदान करणार आहेत असे रिपाइं तर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
