मुंबई : राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आज (ता. २५) विधानभवनात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.
प्रत्येक पक्षाला स्वत:ची भूमिका असल्यामुळे जे राष्ट्रीय प्रश्न आहेत त्यावर राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांमध्ये चर्चा होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार म्हणून किमान समान कार्यक्रमावरच लक्ष केंद्रीत करा. तसेच सरकारच्या निर्णयाचा व धोरणांचा अभ्यास करून ते विधीमंडळात प्रभावीपणे मांडताना तिन्ही पक्षाच्या आमदार व नेत्यांनी एकोप्याने विरोधकांचा सामना करावा.
तसेच सध्या सीसीए, एनआरसी व एनपीआर च्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रश्नावर अकारण आक्रमक होण्याचा विरोधकांचा मानस आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व आमदारांनी त्याकडे दुर्लक्ष करत वादग्रस्त वक्तव्य टाळावीत. जे राष्ट्रीय मुद्दे आहेत त्यावर तिन्ही पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांमधे चर्चा होत असतात. राज्य विधीमंडळात त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही. असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी आमदारांच्या समोर स्पष्ट केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

