मुंबई : शिवसेना खासदार आणि ”सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ‘अनलॉक मुलाखत’ या मथळ्याखाली ही संपूर्ण मुलाखत दोन भागांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित होत आहे. उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे या मुलाखतीमध्ये दिली आहेत. अगदी लॉकडाउनच्या कालावधीपासून ते त्यांच्यावर होणाऱ्या टीकेसंदर्भातही मुख्यंत्र्यांनी आपली रोकठोक मते मांडली आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर देखील या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
फडणवीसांच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की,’ फडणवीस हे अलीकडेच दिल्ली दौऱ्यावर जाऊन आले होते. फडणवीस हे दिल्लीतील तिथली कोरोनाची परिस्थिती बघत असतील. पण तिथल्या परिस्थितीबद्दल काही बोलले नाहीत ते. दिल्लीत जाऊन विरोधी पक्षनेते महाराष्ट्राच्या भयावह परिस्थितीबद्दल बोलले आहेत याचे कारण काय? तर त्यांनी त्यांचा जो आमदारकीचा फंड आहे, तो महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिल्यामुळे सगळ्या गोष्टी ते दिल्लीत जाऊन करत आहेत.’ असा सणसणीत टोला फडणवीसांना लगावला.
केंद्राचे पैसे हळूहळू येत आहेत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हे तुमचं म्हणणं जरी खरं मानलं तरी राज्यातल्या परिस्थितीचे अपडेटस् त्यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटून देणे कितपत योग्य आहे? खरं म्हणजे ही चर्चा मुख्यमंत्र्यांशी करायला पाहिजे. असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला त्यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिल, ‘असं कोण काय म्हणतंय, काय करतंय इकडे लक्ष देत नाही. मी पुनः पुन्हा सांगतोय, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. माझ्यावर माझ्या जनतेचा विश्वास आहे तोपर्यंत काही चिंता नाही. यांचं ठीक आहे. हे बोलतील. बोलत राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी अशी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. हीसुद्धा पोटदुखी असू शकेल. कारण कोरोनाची लक्षणं वेगवेगळी आहेत. लक्षणे वेगवेगळी आहेत. नक्कीच! सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आहेत असं ऐकलंय पण सर्दी, खोकला, ताप, चव जाणे, वास जाणे, अंगावर रॅश येणं, काहीजणांची बोटं काळी-निळी पडतात.’ अशी खिल्लीही फडणवीसांची उडवली.
दरम्यान, संजय राऊत यांनी ठाकरे सरकार सुरू आहे ? असा प्रश्न विचारताच उद्धव ठाकरे यांनी ठाकरे सरकार का म्हणायचं असा उलट प्रश्न केला. तर ‘जो नेतृत्व करतो त्याच्या नावानं सरकार ओळखलं जातं ते ठीक आहे, पण मी नेतृत्व करतोय हा एक भाग झाला. परंतु महाविकास आघाडी म्हणून हे तीन पक्षांचं सरकार आहे. सोबत जे अपक्ष आहेत त्यांचं सरकार आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, ज्यांनी हा प्रयत्न स्वीकारला, या प्रयत्नाचं स्वागत केलं त्या मायबाप जनतेचं हे सरकार आहे’. अस देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
हे ठाकरे सरकार नाही, हे तर मायबाप जनतेचं सरकार – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

