मुंबई : शिवसेना खासदार आणि ”सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ‘अनलॉक मुलाखत’ या मथळ्याखाली ही संपूर्ण मुलाखत दोन भागांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित होत आहे. उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे या मुलाखतीमध्ये दिली आहेत. अगदी लॉकडाउनच्या कालावधीपासून ते त्यांच्यावर होणाऱ्या टीकेसंदर्भातही मुख्यंत्र्यांनी आपली रोकठोक मते मांडली आहेत. महाविकास आघाडी सरकार संदर्भात देखील या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
संजय राऊत यांनी ठाकरे सरकार सुरू आहे ? असा प्रश्न विचारताच उद्धव ठाकरे यांनी ठाकरे सरकार का म्हणायचं असा उलट प्रश्न केला. तर ‘जो नेतृत्व करतो त्याच्या नावानं सरकार ओळखलं जातं ते ठीक आहे, पण मी नेतृत्व करतोय हा एक भाग झाला. परंतु महाविकास आघाडी म्हणून हे तीन पक्षांचं सरकार आहे. सोबत जे अपक्ष आहेत त्यांचं सरकार आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, ज्यांनी हा प्रयत्न स्वीकारला, या प्रयत्नाचं स्वागत केलं त्या मायबाप जनतेचं हे सरकार आहे’. अस देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मी असं कधी म्हणणार नाही की, मी लॉकडाऊन उठवतोय – उद्धव ठाकरे
दरम्यान, लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात देखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. ‘मी असं कधी म्हणणार नाही की, मी लॉकडाऊन उठवतोय. नाही, अजिबात नाही, पण मी हळूहळू एकएक गोष्ट उघडी करत चाललोय आणि माझा प्रयत्न असा आहे की, एकदा उघडलेली गोष्ट परत बंद होता कामा नये. त्यामुळे नुसता आरोग्याचा विचार करून चालणार नाही, नुसता अर्थव्यवस्थेचा विचार करूनही चालणार नाही. जे केवळ आणि केवळ अर्थव्यवस्थेची चिंता करताहेत त्यांनी आरोग्याची चिंता थोडीफार तरी केली पाहिजे आणि जे केवळ आरोग्याची चिंता करताहेत, जे आजच्या घडीला सत्य आणि योग्य असले तरी त्यांनी थोडीफार आर्थिक चिंताही केली पाहिजे. या दोन्हीतलं तारतम्य ठेवावंच लागेल’. अस उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
तर, मुलाखतीच्या सुरुवातीला संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना काही गमतीदार प्रश्न विचारले. तुमच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नाही, फक्त थोडे डोक्यावरचे केस तेवढे गेलेले दिसताहेत, हा सहा महिन्यांतला परिणाम आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, माझा चेहरा स्वच्छच आहे, फेसबुकलाईव्हमध्ये सुद्धा माझा फेस हा स्वच्छच होता. फेसबुकच्या माध्यमातून मी जनतेशी संवाद साधला, त्याला काहीही म्हटलं तरी मी जनतेशी असलेले माझं नातं तुटू दिलं नाही, जनतेशी माझा संबंध दुरावू दिला नाही. त्यांच्यासोबत मी म्हणजे महाराष्ट्र सरकार त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक संकटात, प्रत्येक पावलांवर त्यांच्यासोबत आहे. केस कमी झालेले दिसताहेत, त्याचं कारणही सांगतो, एकतर बऱ्याच दिवसानंतर कालच मी केस कापलेत, गेले तीन-चार महिने स्वत:च स्वत:चे केस थोडेफार कमी करत होतो असं भन्नाट उत्तर त्यांनी दिलं.
…म्हणून माझ्या डोक्यावरचे केस गेले, उद्धव ठाकरेंचे भन्नाट उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

