टीम महाराष्ट्र देशा- शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून पीक विम्याचे हप्ते भरले आहेत. कंपन्यांनी काय गोलमाल केलाय माहिती नाही. गावागावांत मदत केंद्रे स्थापन करा. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची माहिती घ्या. सगळे दस्तऐवज माझ्याकडे आणून द्या. विमा कंपन्यांची कार्यालये मुंबईतच आहेत. सौजन्याने पीक विमा दिला तर ठीक नाहीतर शिवसैनिक आहेतच असा इशारा काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे. त्यामुळे त्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. जालना जिल्हय़ातील साळेगाव घारे येथील चारा छावणीस आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. त्यानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधताना विमा कंपन्यांना शेतकऱ्यांशी नडाल तर याद राखा गाठ शिवसेनेशी आहे असं म्हणत सज्जड दम देखील दिला.
दरम्यान,राळेगावच्या चारा छावणीला देखील ठाकरे यांनी भेट दिली. त्यानंतर बोलताना ठाकरे म्हणाले,शिवसेनेचा मराठवाड्यातील बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव हा माझा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली. काही झालं तरी औरंगाबाद सोडणार नाही. लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या यशाबाबत शंका उपस्थित करण्यात येत होत्या. मात्र शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. दिल्लीत मला जो काही मानसन्मान मिळत आहे, तो तुमच्यामुळेच मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

