टीम महाराष्ट्र देशा : श्रीलंकेमध्ये घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो सामान्य नागरिकांचे प्राण गेले आहेत, बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस दाखवत देशात बुरखा आणि नकाबवर बंदी घातली आहे. हाच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतात देखील बुरखा बंदी करण्याची मागणी केली होती. ‘सामना’ अग्रलेखातून राष्ट्रहितासाठी ही मागणी करत असल्याचं म्हंटले आहे.
मात्र, या अग्रलेखानंतर शिवसेनेत मोठा वाद निर्माण झाला आहे. बुरखा बंदीची मागणी शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी निलम गोऱ्हेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे बुरख्यावरून शिवसेनेत वादळ निर्माण झाल्याच बोलल जात आहे.


