मुंबई – मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणी शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचं सोंग करतंय, असा गंभीर आरोप देखील मेटे यांनी केला आहे.
दरम्यान, ‘मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण सर्वांना विश्वासात घेऊन पावलं उचलत आहेत. त्यांच्या सर्वसमावेशक आणि सावध भूमिकेमुळे मराठा आरक्षणाची बाजू भक्कम होत असून त्यामुळे छुपी कारस्थानं करणाऱ्या मेटेंच्या बोलवते धनी असलेल्या भाजपा नेत्यांच्या पोटात दुखू लागलं आहे,’ असं ट्विट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे.
दरम्यान, ‘आज मराठा आरक्षणावर कोणतीही स्थगिती नाही, तसंच वकीलही पूर्वीच्याच सरकारने नेमलेले आहेत. विनायक मेटे धादांत खोटे बोलत आहेत. जनतेची दिशाभूल ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर करत आहेत. फडणवीसांच्या पायावर घालीन लोटांगण वंदिन चरण म्हणणाऱ्या मेटेंचा खरा भाजपाचा चेहरा मराठा समाज ओळखून आहे,’ अशी टीका सावंत यांनी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी ५० बलिदाने होत असताना, उच्च न्यायालयात फडणवीस सरकारने शपथपत्र दाखल करण्यास ३ वर्ष लावली आणि शिवस्मारकात गैरव्यवहार सुरू असताना गप्प राहणाऱ्या खोटारड्या मेटेंनी मराठा समाजाचा विश्वास स्वत:च केव्हाचा गमावला आहे’, असंही सचिन सावंत ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
दरम्यान, आता मराठा समन्वय समितीचे प्रवक्ते तुषार काकडे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून सावंत चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. आमची या काँग्रेस प्रवक्त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या बोलावत्या धन्याची वैचारिक वेठबिगारी करण्यापेक्षा, त्या महाशयांनी समाजाच्या प्रश्नांसाठी ‘ठोस’ असे काय ‘तीर’ मारलेत ते तपशीलवार सांगावेत ! किंवा ते ‘तीर’ गोळा करून कधीही आमच्याशी जाहीर चर्चा करावी असं आव्हान या समितीने दिले आहे.
मराठा समन्वय समितीचे प्रवक्ते तुषार काकडे यांनी काढलेले प्रसिद्धी पत्रक
वास्तविक ‘सचिन सावंत’ हे महाशय केवळ मराठा म्हणून जन्माला आले एवढच खर बाकी या पलीकडे ‘मराठा’ समाजाच्या समस्यांची, प्रश्नांची त्यांना काडीमात्र माहिती वा अभ्यास नाही. किंबहुना काँग्रेसचे एक प्रवक्ते म्हणून अलीकडे त्याची ओळख होतही असेल कदाचित पण ‘मराठा’ म्हणून समाज त्यांना ओळखतही नाही ! ही वस्तुस्थिती आहे.
तरीही त्यांनी आ.विनायकराव मेटे यांच्यावर आरोप करावेत हे नुसतेच निंदनीय नाही तर हास्यास्पद आहे ! ज्या मेटेसाहेबांनी आपली कारकीर्दच मुळी एक ‘मराठा’ कार्यकर्ता म्हणून केली, ज्यांनी मराठासूर्य अण्णासाहेब पाटील यांचे बोट धरून चळवळ अभ्यासली ! ज्यांनी मराठ्यांच्या प्रश्नांवर हयातभर रस्त्यावर आणि सभागृहातही आवाज उठवला, हजारो आंदोलने केली त्या आ.विनायक मेटेंवर, सावंतांनी टीका करणे हे प्रत्येक मराठा हसण्यावारी घेईल यात शंकाच नाही.
ते ज्या विद्यमान सरकारची भलावण करीत आहेत त्या सरकारचे, मराठा समाजाच्या बाबतीतले पितळ आता उघडे पडले आहे. एकीकडे मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज आहे असे छातीठोकपणे सांगायचे आणि दुसरीकडे सरकारच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात, आमची तयारी नसून कागदपत्रे आमच्या पर्यंत पोहोचली नसल्यामूळे पुढची तारीख द्या अशी याचना करायची ? हा भोंगळपणा नव्हे तर काय ?
ज्या वकिलांनी हायकोर्टात मराठा आरक्षणाला संरक्षण मिळवून दिले त्या वकिलांच्या टीमला पूर्णतः बाजूला ठेवले असताना, आम्ही त्या वकिलांना सुप्रीम कोर्टात सोबतही घेतले आहे असे खोटारडे विधान करणे हे फक्त सचिन सावंतच जाणोत ! अर्थात पक्षश्रेष्ठींची मर्जी सांभाळण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची प्रचंड क्षमता असणाऱ्या व्यक्तीकडून दुसरे काय अपेक्षित ?
आमचे सावंतांना आव्हान आहे…
मा.मेटेसाहेबांच्या २५वर्षांच्या विधान परिषदेच्या कारकिर्दीतील प्रत्येक अधिवेशनाचे रेकॉर्ड तपासावे जे विधानभवनात त्यांना सहज उपलब्ध होईल. त्यांनी एकच अधिवेशन दाखवावे की जिथे मेटेसाहेबांनी ‘मराठा’ या विषयावर आवाज उठवला नाही ! त्यांनी अनेकदा प्रसंगी सभागृहही बंद पाडले हा इतिहास आहे !
अर्थात, ज्यांनी मराठा ‘असण्याशिवाय’ आयुष्यात कधीही समाजाच्या प्रश्नांवर ‘ब्र’ही उच्चारला नाही, कधी समाजाच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेले समाजाने पहिलेच नाही ! अशा सचिन सावंतांकडून ही अपेक्षाही चुकीचेच आहे म्हणा !
आमची या काँग्रेस प्रवक्त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या बोलावत्या धन्याची वैचारिक वेठबिगारी करण्यापेक्षा, त्या महाशयांनी समाजाच्या प्रश्नांसाठी ‘ठोस’ असे काय ‘तीर’ मारलेत ते तपशीलवार सांगावेत ! किंवा ते ‘तीर’ गोळा करून कधीही आमच्याशी जाहीर चर्चा करावी.
बोलावत्या धन्याची आज्ञा मानायची व काहीही बेताल वक्तव्य करण्याची सावंतांची आगतिकता आम्ही समजू शकतो. पण यातून जर समाजाचा आणि भावी पिढ्यांचा घात झाला तर ते नुकसान कधीही भरून निघणार नाही याचे भान त्यांनी ठेवावे.
काही नकारात्मक झालेच तर त्याचे परिणाम तुम्ही ‘नामशेष’ होण्यात होईल यात शंकाच नाही पण त्यातून गोरगरीब मराठ्यांचे कधीही न भरुन निघणारे प्रचंड नुकसान होऊ शकते. व ते आम्ही कदापिही होऊ देणार नाही ! काँग्रेस प्रवक्ते श्री.सचिन सावंतांची राज्यातील मराठ्यांनी यापूर्वीही कधी दखल घेतली नव्हती व यानंतरही घेणार नाहीत. तरीही त्यांना उत्तर देऊन आम्ही त्यांचा एकप्रकारे बहुमानच करत आहोत !
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
‘सरकारच्या ऑनलाईन शिक्षणात गरीब, आदिवासी विद्यार्थ्यांचा विचारच नाही’
मध्यरात्री गावातील वीज पुरवठा बंद करुन बेळगावात शिवरायांचा पुतळा पुतळा हटवला
राष्ट्रवादीच्या ‘या’ झुंजार नेत्याचे झाले कोरोनामुळे निधन; दिग्गज नेत्यांनी व्यक्त केला शोक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
