मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दरम्यान भाजपकडून महाराष्ट्र बंदचा विरोध केला जात असून आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. भाजपा नेत्यांनी केलेले आरोप खाडून काढत आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर खळबळजनक आरोप केले आहेत. आशिष मिश्राला वाचवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे, असे नाना पटोले टीव्ही ९ शी बोलताना म्हणाले.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, लखीमपूर येथे केंद्रातल्या गृह राज्यमंत्री ज्यांच्यावर खुनाचे हायकोर्टात ट्रायल सुरु आहे, त्यांच्यावर नेपाळ आणि भारतात स्मगलिंग केल्याचाही आरोप आहे. अशा अजय मिश्रा नावाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलाने कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडल्याची घटना दुर्दैवी आहे.
या घटनेनंतर आमच्या नेत्या प्रियांका गांधी यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. त्यांचे अपहरण करण्यात आले आणि कुठल्याही न्यायालयासमोर त्यांना हजर न करता ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम उत्तर प्रदेश सरकारने केले आहे. ज्या प्रकारे एका महिलेला भाजपने त्रास दिला तेही देशाच्या लोकांनी पाहिलं आहे. आशिष मिश्राला अटक केली पण, त्याला कुठलाही पिसीआर न घेता न्यायालयीन कोठडीत टाकणे म्हणजे त्याला वाचवण्याचा प्रयत्नच आहे.
त्यावर ३०२ अंतर्गत तातडीने कारवाई व्हावी, तसेच, अजय मिश्रा यांना तातडीने मंत्रिमंडळातून काढण्यात यावे ही मागणी आज काँग्रेसच्या वतीने संपूर्ण देशभरात केली जात आहे. त्यासाठीच महाराष्ट्र बंदचा नारा महाविकास आघाडीने लावला आहे. असे नाना पटोले यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- पावसाने केला भाजपच्या अपयशाचा पंचनामा; माजी आमदार मोहन जोशी यांची खरमरीत टीका
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान राज्यभरातील एसटी सेवा सुरू राहणार, महामंडळाचा निर्णय
- ‘लग्नासाठी धर्मांतरण करणारे हिंदू मोठी चूक करतायत’; भागवतांनी व्यक्त केली नाराजी
- ‘नागरिकांनी घाबरून न जाता कुणी दबाव टाकत असेल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा’


