औरंगाबाद : महापालिकेतर्फे आकारण्यात येणाऱ्या नव्या परवाना शुल्काला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे या संदर्भात जिल्हा व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी महापालिका उपायुक्तांना निवेदन देऊन निषेध नोंदवला. शहरातील व्यापार्यांकडून परवाना शुल्क वसूल करण्याचे आदेश शासनाने राज्यातील महापालिकांना दिले होते. इतर महापालिकांनी त्याची अंमलबजावणी केली पण औरंगाबाद महापालिकेने अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे लेखापरीक्षण अहवालावर आक्षेप घेण्यात आला होता.
त्यानंतर महापालिकेने कराची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र व्यापाऱ्यांनी यास तीव्र विरोध केला आहे. दरम्यान लोकलेखा समितीने देखील आक्षेप घेत महापालिकेला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने शपथपत्र दाखल केले आहे. त्यानंतर ही कर आकारणी सुरू न झाल्याने समितीने प्रशासनाला स्मरणपत्र दिले आहे.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हा व्यापारी महासंघाने प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवित परवाना शुल्क याला तीव्र विरोध दर्शवला आहे. महासंघाच्या शिष्टमंडळाने उपायुक्त अपर्णा थेटे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाच्या आदेशानुसार बरेच दिवस बाजारपेठ बंद होती त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आज पर्यंत शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही.
त्यात नवीन प्रकारचा कराने व्यापारी बांधवांवर अन्याय करू नये त्याला आमचा तीव्र विरोध आहे. व्यापारी मालमत्ता कर व्यावसायिक दराने भरतात त्यामुळे नवीन कराला आमचा विरोध आहे तसेच मालमत्ता करावर लावण्यात येणाऱ्या दंडव्याज २०२२ पर्यंत माफी देण्यात यावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिव लक्ष्मीनारायण राठी, तनसुख झांबड, अजय शहा, गुलाब हक्कानी, जयंत देवळानकर, संतोष कावळे, राजेंद्र मंडलिक, ओम सेठ यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेना भवनावर आंदोलन कराल तर असंच उत्तर मिळणार – राहुल शेवाळे
- ‘जे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक दाखवा’; अमेय खोपकरांचा सरकारवर निशाणा
- ‘माझ्या आजारपणाचा फायदा घेत काकांनी कट रचला’, चिराग पासवान यांचा आरोप
- ‘संभाजीराजेंनी आजचे आंदोलन मुख्यमंत्र्यांकडून चर्चेची वेळ मिळावी म्हणून केले होते का?’
- ‘खोटारड्या मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का?’

