टीम महाराष्ट्र देशा : राज्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. त्यात आता हवामान खात्याने देखील दुष्काळात तेरावा महिना पडवा अशी माहिती दिली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा अल्निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणार आहे. दरवर्षी 7 जूनच्या आसपास पडणारा पाऊस आता जूनअखेरीस हजेरी लावेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे असे देखील सांगण्यात येत आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर सत्ताधारी नेत्यांना दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. तर दुसरीकडे विरोधकांना देखील दुष्काळग्रस्त जनतेची खूपच काळजी वाटू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक घेत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे राज्य सरकारला आणखीनच चिंतेत टाकले. अल्निनोचा प्रभाव कमी होत असला तरी तो पूर्णपणे नाहीसा झाला नसल्याने त्याचा परिणाम राज्याच्या पर्जन्यमानावर होणार आहे. राज्यात साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. मात्र, यंदा मान्सून जूनअखेरीस राज्यात दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान राज्यात सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पुरेसे पाणी आणि चारा नसल्याने जनावरांना देखील मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. शेतकरी देखील हताश झाला असून राज्यसरकारच्या मदतीची वाट पाहत आहे. मात्र आता हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाज पत्रकामुळे दुष्काळात तेरावा महिना पडणार असल्याच दिसत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

