मुंबई : क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम बनताना आपण पाहिले आहेत. त्याचबरोबर क्रिकेट खेळात अनेक लाजिरवाणे विक्रमही आपण पाहिले आहेत. या खेळात कधी काय घडेल कोणीच सांगू शकत नाही. आता क्रिकेटमध्ये एकही चेंडू न टाकता दोन फलंदाज बाद झाल्याची घटना घडली, असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. आतापर्यंतच्या कोणत्याही क्रिकेट सामन्यांमध्ये अशी घटना आतापर्यंत घडलेली नाही. चेंडू टाकल्यावर त्यावर फटका मारल्यावर खेळाडू बाद होतो, असे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. पण एका सामन्यात एकही चेंडू न टाकता चक्क दोन फलंदाज बाद झाल्याची घटना आता समोर आली आहे.
नेमकं काय घडलं…
इंग्लंडमध्ये क्रिकेटची टी-२० ब्लास्ट ही स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत वॉरविकशायर आणि नॉटिंगहॅम या दोन संघांमध्ये सामना सुरु होता. पावसामुळे हा सामना प्रत्येकी आठ षटकांचा खेळवण्यात आला होता. या सामन्यात वॉरविकशायरचा संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. कार्लोस ब्रेथवेटने धडकेबाज फटकेबाजी करत ११ चेंडूंत १७ धावा फटकावल्या होत्या. पण अंतिम षटक सुरु होण्यापूर्वीच त्याच्या जागी सॅम हेनला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. पण सॅमला एकही चेंडू खेळायला मिळाला नाही. वॉरविकशायर ने यावेळी ८९ धावा केल्या. त्यामुळे नॉटिंगहॅमला विजयासाठी ९० धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना नॉटिंगहॅमला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी तीन धावा हव्या होत्या. त्यावेळी नॉटिंगहॅमने समित पटेलला रिटायर्ड आउट केले. यापूर्वी कार्लोस ब्रेथवेटच्याबाबतही वॉरविकशायरने असाच निर्णय घेतला होता. त्यामुळे एकाच सामन्यात चेंडू न टाकताही दोन फलंदाज बाद झाल्याची ही पहिली घटना आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ फलंदाजी करत असताना आर. अश्विनला त्यांनी रिटायर्ड आउट केले होते. पण या सामन्यात अश्विन हा फक्त एकच फलंदाज रिटायर्ड आउट झाला होता.
नॉटिंगहॅम सामना जिंकण्यात अपयशी
नॉटिंगहॅमने अखेरच्या चेंडूवर तीन धावा हव्या असताना समित पटेलला रिटायर्ड आउट केले. समितच्या जागी यावेळी टॉस मुर्सला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. अखेरचा चेंडू हा फ्री-हीट होता. पण पटेलच्या जागी टॉस मुर्स हा फलंदाजी करायला आला असला तरी तरी त्याला एकच धाव करता आली आणि नॉटिंगहॅमला हा मोठा बदल करूनही पराभव पत्करावा लागला.
महत्वाच्या बातम्या:

