पुणे : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून आज राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ६३ वर पोहचली आहे. राज्यात कोरोनाची लागण झालेल्यांचा खर्च राज्य सरकार करणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चार महत्त्वाची शहरे लॉक डाउन करण्यात आली आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण येत आहे. अशातच कोरोनाशी लढण्यासाठी राज्याकडे पुरेसा पैसा आहे. यासाठी केंद्राला निधी मागण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्राकडे निधी मागण्याची गरज नाही. राज्य त्यासाठी सक्षम आहे. केंद्र सरकार कोरोनाबाबत महाराष्ट्राशी संपर्कात आहे. पंतप्रधान, केंद्रीय आरोग्यमंत्री सातत्यानं संपर्क करत आहेत.
कोरोना व्हायरसच्या या संकटाविरोधात राज्य सरकार सर्वतोपरी उपाययोजना करत आहेत. यामध्ये नागरिकांचेही सहकार्य महत्त्वाचे आहे. आपण सध्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. मात्र, येणारा काळ कठीण आहे. गर्दी कमी झाली नाही तर बस आणि रेल्वे सेवाही बंद करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं अजित पवार म्हणाले. ज्यांचं हातावर पोट आहे, त्यांच्या बाबतीत कंपनी मालकांनी माणुसकीने वागून त्यांना किमान वेतन द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो, असंही अजित पवार म्हणाले.
तसेच, रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स, कर्मचारी, पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनाही एक दिवस सुट्टी कशी करता येईल यासाठीही चर्चा सुरू आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जे कर्मचारी काम करतायत त्यांना विश्रांती देणंही गरजेचं आहे. त्यांना पर्यायी कर्मचारी दिले जातील, असंही ते म्हणाले.
राज्य सरकारकडून नागरिकांना वारंवार गर्दी कमी करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र गर्दी कमी झाली नाही तर जिथं आवश्यक आहे तिथं सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात येईल. मुंबईच नव्हे तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील असा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, विवाह, अंत्यविधीप्रसंगी होणारी गर्दी टाळली पाहिजे, असंही ते म्हणाले.


