मुंबई : ‘महाराष्ट्रात एकही करोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. तसेच आतापर्यंत कोरोनावर कोणतंही अँटी-व्हायरल ड्रग उपलब्ध नाही. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कक्ष सुरु केल्याचंही टोपेंनी सांगितलं.
जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने आता भारतातही शिरकाव केला आहे. भारतातही कालपर्यंत सहा जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती उघड झाली होती. मात्र आता देशातील कोरोना व्हायरसग्रस्त रुग्णांची संख्या 28 वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. इटलीमधून भारतात पर्यटनासाठी आलेल्या एका ग्रुपमधील 16 जण कोरोनाग्रस्त आहेत. तर त्यांच्या संपर्कात आलेला आणि त्यांच्यासोबत असलेला एक भारतीय चालकही कोरोनाबाधित आहे.
परंतु राज्यात सहा कोरोना संशयित निरीक्षणाखाली होते. त्यामध्ये मुंबईतील चौघांचा तर पुण्यातील दोघांचा समावेश होता. परंतु त्यापैकी एकालाही कोरोनाची लागण झालेली नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाला नसल्याचं सांगत, कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून वैद्यकीय पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज असल्याचा दावाही टोपे यांनी केला.
त्याचप्रमाणे, कोरोना व्हायरस जगभरात वेगानं फोफावू लागल्यानं अफवांनाही वेग आला आहे. त्यामुळं ठिकठिकाणची सरकारं व प्रशासनाकडून नागरिकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही नागरिकांना निर्धास्त राहण्याचं आवाहन केलं आहे. ‘करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून वैद्यकीय पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज आहेत.
राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेत आहे. ‘कोरोना’च्या संशयितांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दहा खाटा स्वतंत्र ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही करोनाग्रस्तांवर उपचार करण्याचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे,’ अशी माहितीही टोपे यांनी दिली.


