नांदेड : पुणे, मुंबई, हैदराबाद येथून शेकडो प्रवाशी नांदेड शहरात दाखल होत आहेत. या दरम्यान २० मार्चला शहरात दाखल झालेल्या नागरिकांपैकी तीन व्यक्तीस कोरोना संशयित म्हणून शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन व्यक्तीस जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांचे ‘स्वॉब’ घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्या पाचही संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यामुळे नांदेडकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहेत.
शहरात नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये, घरात थांबत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ‘कोरोना’ची पूर्व खबरदारी उपाययोजना म्हणून पुणे किंवा मुंबई शहरातून नांदेडमध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींच्या तपासणीचे आदेश आरोग्य विभागास दिले आहेत.
आयसोलेशन व क्वॉरंटाईन वार्डची स्थापना
शहरात गेल्या दोन दिवसापासून दाखल झालेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहेत. कोरोना आजाराची काही लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. त्या कक्षात ठेवून त्यांच्यावर लक्षणानुसार उपचार केला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी दिली.
नांदेड शहर व जिल्ह्यात आयसोलेशन व क्वॉरंटाईन वार्डची स्थापना करण्यात आली असून, जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय व खासगी रुग्णालयात या विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.


