टीम महाराष्ट्र देशा : सेवाभावी कार्यकर्त्याला मानसन्मानची अपेक्षा नसते. चांगले काम केल्यावर त्यातून मिळणारा आनंद व आत्मिक समाधान हेच त्याचे बक्षीस असते. आज सर्वच क्षेत्रात नकारात्मकता वाढत असताना समाजसेवी अझिज मक्की यांच्याप्रमाणे अधिकाधिक सकारात्मक कार्य होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
ज्येष्ठ समाजसेवक अझिज मक्की यांच्या समाजसेवा कार्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अंजुमान ए इस्लाम शिक्षण संस्थेच्या वतीने अंजुमनच्या करिमी ग्रंथालय येथे काल त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी राज्यपाल बोलत होते.
नागपाडा येथील ‘पी.टी. माने उद्यान या बहुउद्देशीय संकुलाच्या निर्मितीतून गरीब रुग्णांना मोफत डायलिसीस सेवा, कम्प्युटर प्रशिक्षण वर्ग, यांसारखी नि:स्वार्थ सेवा करीत असल्याबद्दल राज्यपालांनी अझिज मक्की यांचे कौतुक केले, तसेच आपण माने उद्यान संकुलास भेट देऊन सेवाकार्याची व्यक्तीशः पाहणी करू, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
सत्कार सोहळ्याला खासदार हुसेन दलवाई, आमदार रईस शेख, अंजुमनचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी, उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, हजरत मौलाना अथर अली, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
भारतात आजवर महिलांनी खूप कष्ट सोसले आहेत, आजही अनेक महिलांचे जीवन कष्टप्रद आहे. त्यामुळे देशाच्या सर्वांगीण प्रगतीकरिता महिलांच्या उत्थानासाठी व सक्षमीकरणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले.
जवळजवळ दीडशे वर्षांचा इतिहास लाभलेली अंजुमन या संस्थेचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ झहीर काझी यांनी सांगितले. संस्थेच्या भव्य ग्रंथालयात भगवतगीता, बायबल, कुराण यांची विविध भाषांमधील भाषांतरे तसेच इतर दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अंजुमन देशात 110 शैक्षणिक संस्था चालवीत असून 1 लक्ष 10 हजार विद्यार्थी तेथे शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपट निर्माते इस्माईल मर्चंट, अभिनेते दिलीप कुमार, माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले, क्रिकेटपटू गुलाम परकार, वसीम जाफर आदी अंजुमनचे माजी विद्यार्थी असल्याचे त्यांनी संगितले.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

