नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते. दिवसेंदिवस करोनाबाधितांचा आकडा हा कमी होताना दिसत आहे.
परंतु आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठे भाष्य केले आहे. ‘देशात करोनाची तिसरी लाट येणार आहे हे वास्तव आहे. त्यामुळे आम्ही आता या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याचे काम युद्धस्तरावर हातात घेतले आहे’ अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. ते म्हणाले की, ब्रिटनमधून या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. तेथे करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत.
तेथे करोना लसीकरणाचे काम 45 टक्के पूर्ण झाले असतानाही ब्रिटनमध्ये करोना रुग्ण वाढीला लागणे हे तिसऱ्या लाटेचेच संकेत मानावे लागतील. त्यामुळे आता आपल्याला निवांत बसून चालणार नाही. केजरीवाल यांच्या हस्ते आज दिल्लीतल्या नऊ रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या 22 प्लांटचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, या प्लांटमुळे आमची करोना विरोधातील लढाई आणखी सोपी होणार आहे. ते म्हणाले की, तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी आम्ही अधिकाधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. ज्या प्रमाणे दुसऱ्या लाटेचा आपण एकजुटीने सामना केला तशीच एकजूट आपल्याला या संभाव्य लाटेसाठीही करावी लागणार आहे असे ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणेकरांना दिलासा ! आज ४५९ रुग्ण कोरोनामुक्त, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘बाळासाहेब असते तर विमानतळाला नाव नाकारले असते!’, भुजबळांचा शिवसेनेला सल्ला
- ‘मी लठ्ठ असले तरीही…’, आपल्या लठ्ठपणावर बोलली विद्या बालन
- श्रीलंका दौऱ्यावर जाण्याआधी खेळाडूंना राहावं लागणार ‘इतके’ दिवस ‘क्वारंटाइन’
- आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’


