टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील सारथी संस्थेत होणाऱ्या गैरव्यवहाराच्या निषेधार्थ खासदार संभाजी राजे आजपासून (ता. ११) लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा तरुणांना शिक्षणामध्ये आर्थिक सहाय्य करणारा सारथी उपक्रम बंद करायचा डाव असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी पुण्यातील सारथी संस्थेसमोर ते उपोषण करणार आहेत.
संभाजी राजे म्हणाले, ” अनेक दिवसांपासून मी याविषयी सर्व त्या स्तरावर पाठपुरावा करत आहे. पण निर्णय काही होताना दिसत नाही. म्हणून लाक्षणिक उपोषणाचा मार्ग मी निवडला आहे. लोकशाही मार्गाने, शांतता पूर्वक कुठलाही कायदा हातात न घेता आम्ही हा लढा उभारणार आहोत. आरक्षणाचा लढा असेल, किंवा इतरही अनेक मागण्या असतील त्यासाठी मी जमेल तितके प्रयत्न करत असतो. आज सारथीसारखी अत्यंत उपयुक्त असलेली संस्था काही अधिकारी व काही झारीतील शुक्राचार्य मिळून किरकोळ स्वार्थासाठी बंद पाडत असतील, तिला बदनाम करण्याचा घाट घालत असतील तर ते आम्ही होऊ देणार नाही. अशी टीका त्यांनी केली आहे.
तसेच मराठा समाजाचा आजपर्यंत केवळ राजकारणासाठी वापर झाला. त्यांच्या मूळ दुखण्याकडे राजकारणा पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे. परंतु आज घडीला मराठा समाज हा अत्यंत विपरीत परिस्थितीतून वाटचाल करतोय. तो अडचणीत सापडलाय. महाराष्ट्रात मोठा भाऊ म्हणून ओळखला जाणारा, ग्रामीण समाज व्यवस्थेचा आणि अर्थव्यवस्थेचा कणा असलेला हा समाज सर्व बाजूनी पिछेहाटी च्या मार्गावर आहे. त्यांची बाजू कुणीतरी मांडलीच पाहिजे. अशी खदखद यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, संभाजीराजे सारथी संस्थेसाठी लाक्षणिक उपोषणाला पाठींबा देत महाराष्ट्रातील हजारो युवक आणि समाज धुरीणी पुण्यात येण्याच्या तयारीत आहेत. तर समाजमाध्यमातूनही राजेंच्या या उपोषणाला अनेकजणांनी पाठिंबा दिला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
