🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- मृग व आद्रा नक्षत्र कोरडेठाक गेल्यानंतर थोडाफार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या हुलकावणीने अनेक भागात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.दुबार पेरणी करण्यासाठीची नेमकी तारीखही कृषी विभागाकडून कळविली जात नाही. किती दिवस दुबार पेरणी केली तर चालेल, याची शाश्वती नसल्याने अनेकांनी आपले शेत आता खरिपाऐवजी रबी हंगामासाठी तयार करून ठेवले आहे.
राज्य शासनाकडून कृत्रिम पावसाच्या घोषणा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मध्यंतरी औरंगाबादेतून कृत्रिम पाऊस पाडावा म्हणून यंत्रणाही हलली होती. या पावसासाठी लागणारे तांत्रिक साहित्य विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणारे वातावरणही सध्या किमान जालना जिल्ह्यात दिसून येत नाही. सोलापूर आणि त्या भागामध्ये मंगळवारी कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्याची माहिती देण्यात येत आहे. परंतु जालना, औरंगाबाद या भागात हा प्रयोग कितपत यशस्वी होईल, याबद्दलही शंका घेतली जात आहे.
दरम्यान, जुलै महिना संपत आला तरी राज्यात अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. खरिपाच्या ५० टक्केही पेरण्या झालेल्या नाहीत. आताच दुष्काळासारखी परिस्थिती आहे, त्यामुळे सरकारने तातडीने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

