टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषीत अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. भाषावार प्रांतरचनेदरम्यान कर्नाटकात अडकलेल्या मराठी भाषिकांना आणि हा लढा सुरू ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असे ते म्हणाले होते. आता यावर प्रतिक्रया येण्यास सुरवात झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय, अत्याचार होत आला आहे. यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल केला होता.
यावर आता आम आदमी पार्टीचे राज्य संयोजक रंगा राचुरे यांनी पाटील यांना ‘दहशतवादीच’ म्हटले आहे. ते म्हणतात, ‘कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील मराठी भाषिकांची मुख्यत्वे विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी यांची मुस्कटदाबी अनेकदा केली जाते. मराठी भाषिकांचा असंतोष समजून न घेता, त्याचे उत्तर न काढता त्यांना गोळ्या घाला, ही भाषा दहशतवादीच आहे.
पुढे ते म्हणाले, ‘ही मराठी अस्मितेची गळचेपी करण्याची हुकूमशाही आपल्या संविधानाच्या विरोधातील असून मराठी माणसाच्या नावाने मते मागणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुळमुळीत भूमिका न घेता थेट पोलीस कारवाई करायला हवी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी त्यावर प्रतिक्रया दिली, ते म्हणाले ‘भारत एक राष्ट्र आहे हे कदाचित त्याला माहिती नसावे. महाराष्ट्र कर्नाटक दोन्ही सरकारने याची गंभीर दखल घेणे आवश्यक असून अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे.
दरम्यान, आज कोल्हापूर येथील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. थेट महाराष्ट्र कर्नाटक महामार्गावर भीमाशंकर पाटलांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची तिरडी काढून दहन करत निषेध नोंदवला. तसेच महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांना आपला पाठींबा असल्याचे यावेळी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

