🕒 1 min read
औरंगाबाद : विश्वासनगर-लेबर काॅलनीतील शासकीय वसाहतीच्या ३३८ घरांवर लवकरच बुलडोझर फिरणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या कारवाईसाठी पथकांची नेमणूक देखील केली आहे. परंतु या कारावाईच्या विरोधात गेल्या अनेक वर्षापासून या घरांमध्ये राहणाऱ्या नागरीक आणि कुटुंबांनी आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी रविवारी (दि.१४) या भागातील नागरिकांची भेट घेतली. ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय नोकरीत होती त्यांनाच हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खैरे यांनी स्पष्ट केले. अनेक घुसखोर या वसाहतीमध्ये घुसले आहेत. त्यांना मात्र बाहेर काढणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विश्वासनगर-लेबर काॅलनीतील मोडकळीस आलेल्या व जीर्ण झालेल्या घरांचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेला आहे. न्यायालयाने वारंवार नोटीस बजावल्यानंतर देखील येथील नागरिकांनी घरे रिकामी केली नाही. ३०-३५ वर्षांपासून अनेक कुटुंब येथे राहतात. त्यामुळे आधी आमची पर्यायी व्यवस्था करा, मगच कारवाईची भाषा करा, अशी मागणी येथील रहिवांशी केली आहे. अनेक राजकीय पक्षांनी देखील हीच भूमिका घेतली. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देखील यावर चर्चा झाली. कायद्यानुसार काम करू, नागरिकांना दिलासा देण्याचाही प्रयत्न करू, असा विश्वास पालकमंत्र्यांनी येथील रहिवाशांना दिला होता. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार विश्वासनगर-लेबर काॅलनीत कारवाई होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी या वसाहतीतील अनेक घरांवर घुसखोरांनी कब्जा केल्याचा आरोप केला. यावेळी ते म्हणाले, काहींनी तर ही घरे दुसऱ्याला भाड्याने दिली आहे. अशा घुसखोरांमुळेच खऱ्या हक्कदारांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आपण अशा घुसखोरांना पाठीशी घालणार नाही. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी देखील चर्चा केली आहे. त्यामुळे घुसखोरांना तर बाहेर काढणारच, पण ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय नोकरीत होती, आता ती हयात नाही अशा मुळ कुटुंबाची पर्यांयी व्यवस्था, त्यांना घर मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. पालकमंत्री सुभाष देसाई यांची देखील हीच भूमिका आहे, मी त्यांच्यांशी व विभागीय आयुक्तांशी याविषयी बोलणार आहे, असेही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- किरण रावशी घटस्फोटानंतर पुन्हा एकदा सिंगल झाला आमिर खान
- भाजप नेत्यांचं दंगे घडवण्याचं षडयंत्र, पैसेही वाटले; मलिकांचा खळबळजनक आरोप
- ‘महात्मा ज्योतीराव फुले’ योजनेचा वैजापूरातील ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ
- आता राष्ट्रवादीही मनपा निवडणुकीच्या रिंगणात, औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी
- ‘माणूस म्हणून कधीच विरोध केला नाही, काही लिखाणावर आक्षेप होता’

