अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करून त्यांना आरक्षण देण्यास भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी पुन्हा एकदा ठाम विरोध दर्शविला आहे. धनगर आणि धनगड या दोन जातींसंबंधी संशोधन केलेला टाटा समाजिक संस्थेचा अहवाल दोन वर्षांपूर्वीच सरकारला सादर करण्यात आला आहे.
धनगर हे धनगडच आहेत, असे म्हणून त्यांचा आदिवासी जातींमध्ये समावेश करण्याच्या मागणीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी हा अहवाल प्रसिद्ध होणे आवश्यक आहे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते, आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांनी केली आहे.
दसरा मेळाव्याच्या भाषणात आदिवासी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता धनगरांना वेगळे आरक्षण देऊ असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्याबद्दल पिचड यांनी ठाकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत. यासंदर्भात पिचड पुढे म्हणाले की, धनगर समाजाला आदिवासी व्यतिरिक्त स्वतंत्र आरक्षण दिल्यास आदिवासी समाजाची त्याला हरकत असणार नाही फक्त आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगरांचा समावेश करू नये.
आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या धनगर समाजाचे म्हणणे आहे की, आम्ही धनगड आदिवासी या जातीचे आहोत. धनगड ही जात आदिवासी आहे म्हणून आमचा आदिवासी समाजामध्ये समावेश करून घेण्यात यावा. म्हणून या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी मुंबईच्या टाटा सामाजिक संस्थेकडे हे काम सोपविण्यात आले होते.
या संस्थेने सर्व कागदोपत्री पुरावे तपासले. महाराष्ट्रातील आदिवासी विभागात व धनगर सामाजाच्या जास्त लोकवस्ती असलेल्या विभागाला भेटी दिल्या. या टाटा सामाजिक संस्थेने आपला अहवाल राज्य शासनाकडे देवून दोन वर्ष झालेली आहेत.
त्यामुळे आमची आदिवासी समाजाची विनंती आहे की, टाटा सामाजिक संस्थेने सरकारला दिलेला अहवाल त्वरीत प्रसिध्द करण्यात यावा, व खरे खोटे स्पष्ट करुन महाराष्ट्रातील आदिवासी लोकांच्या समोर आणावे. सध्या आदिवासी सामाजाला दिलेल्या ७.५ टक्के आरक्षणामध्ये कोणत्याही जातीचा समावेश करु नये, असेही पिचड यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- आजपासून जलतरण तलाव,चित्रपटगृहे होणार सुरु मात्र धार्मिक स्थळे राहणार बंदच
- ‘भारत कोरोनावर विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे’
- कोरोना प्रतिबंधक लस उपलब्धतेनंतर जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून पूर्वतयारी झाली सुरु
- अर्णब प्रकरणावरून दिल्लीमध्ये रंगले पोस्टर वॉर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

