औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील वाळूज परिसरामध्ये एक अजबच घटना घडली आहे. अगदी शुल्लक कारणावरून बहीण भावामध्ये सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची ही घटना आहे. आपल्याला आई शिकू देत नाही अशी तक्रार अल्पवयीन मुलीने आपल्या मामी, मामांकडे केली. याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी मामा आणि भाची वाळूज पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले. आणि त्याच वेळी या ठिकाणी पोहोचलेल्या मुलीच्या आईने पोलीस स्टेशन समोर मोठा राडा घातला.
याविषयी अधिक माहिती अशी अल्पवयीन मुलगी बजाज नगर मध्ये आई रामकौरसोबत राहत होती. या ठिकाणी असलेल्या एका खाजगी शाळेत ती दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहा महिन्यांपूर्वी ती बीडला आपल्या मामाच्या घरी गेली. दहावीचे वर्ष असल्याने याच ठिकाणी ती अभ्यास करत होती. मात्र परीक्षेचा अर्ज बजाज नगर मध्ये भरण्यासाठी तिला मामासोबत या ठिकाणी यावे लागले. परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुलगी बजाज नगरमध्ये आली हे कळताच आई रामकौरने तिची भेट घेऊन आपल्याकडे राहण्यास सांगितले.
मात्र मुलीने आपल्या आजोळी राहण्याचा हट्ट धरला. यावेळी आई आणि मुलीच्या मामामध्ये मुलीला घेऊन जाण्यावर मोठा वाद झाला आणि या वादाचे रूपांतर शेवटी मारहाणीमध्ये झाले. हा वाद वाढत गेल्याने मामा-भाची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले. मात्र आईने आणखी दोन महिलांना सोबत घेऊन आपल्या भावाला मोठ्या प्रमाणावर मारहाण केली. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने प्रकरण वाढले नाही. मुलगी अल्पवयीन असल्याने याबाबत वाद सुरूच राहिल्याने पोलिसांनी सदर मुलीला बालसुधारगृहात पाठवून दिले.
महत्त्वाच्या बातम्या

