मुंबई : माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीचा निर्णय घेतला होता. हे धोरण रद्द करून शिक्षकांच्या बदल्या ऑफलाइन करण्याची महाविकास आघाडी सरकारने घोषणा केली होती. मात्र, शिक्षक संघटनांच्या दबावापुढे झुकत ऑनलाइन बदली धोरण पुढेही कायम ठेवण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. संघटनांच्या मागण्यांचा विचार करून नवीन बदली धोरण तयार केले जाईल. जून २०२१ पूर्वी राज्यातील शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या केल्या जातील, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे तसेच शिक्षक बदली धोरण अभ्यास गटाचे अध्यक्ष आयुष प्रसाद, सदस्य डाॅ. संजय कोलते, कान्हुराज बगाटे, सर्जेराव गायकवाड, विनय गौडा यांनी मंत्रालयात ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी २७ फेब्रुवारी २०१७च्या शासन निर्णयातील त्रुटी दूर करण्यास मुश्रीफ यांनी सहमती दर्शवली. दरम्यान, शिक्षक बदल्या जेव्हा ऑफलाइन होत्या, तेव्हा मोठा राजकीय हस्तक्षेप होता. तो मोडीत काढण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा यांनी ऑनलाइन बदली धोरण आणले. राष्ट्रवादीला ते मोडीत काढायचे होते. मात्र, शिक्षकांच्या दबावामुळे ते जमले नाही.
या आहेत शिक्षकांच्या मागण्या
आंतरजिल्हा बदलीत आपापसात बदलीस संधी द्यावी. शून्य बिंदू नामावली धरून बदल्या कराव्यात. १० टक्के रिक्त पदांची अट न ठेवता आंतरजिल्हा बदल्या करून रिक्त झालेली पदे नवीन शिक्षक भरतीत भरावीत. आंतरजिल्हा बदलीसाठी पूर्वी नाहरकत दिलेल्या शिक्षकांचा प्राधान्याने विचार करावा, अशा मागण्या शिक्षक प्रतिनिधींनी केल्या. एका शाळेवर ५ वर्षे सेवा पूर्ण झाल्यावरच प्रशासकीय बदली, तर ३ वर्षांनंतर विनंती बदली करावी आदी मागण्या शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
- गाझीपूर सीमेवर पोलिसांनी लावलेले खिळे शेतकऱ्यांनी उपसले!
- मोठी बातमी : काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली
- ग्रेटा थनबर्गने डिलीट केलेल्या ट्विटमध्ये होते तरी काय ?
- मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दौरा; नव्या घोषणा होण्याची शक्यता
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
