टीम महाराष्ट्र देशा : कधीकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलुख मैदानी तोफ असलेले सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या मतभेदातून संघटनेला रामराम ठोकून आपली वेगळी चूल मांडली. रयत क्रांती संघटना उभी करत भाजपशी घरोबा केला आणि राज्याच्या कृषिराज्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र आता सदाभाऊ खोत भाजपवर सुद्धा नाराज असल्याची बातमी समोर येत आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत अजुनही निर्णय होत नसल्याने सदाभाऊ खोत हे अस्वस्थ झाले आहेत. भाजप या मतदारसंघाबद्दल काहीच भूमिका घेत नसल्याने तसेच हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यात जमा झाल्याची चर्चा आता सुरु झाल्याने सदाभाऊ खोत नाराज झाल्याची चर्चा आहे. या मतदार संघात आपल्या संघटनेचे चांगले काम आहे. तसेच जनसंपर्कही चांगला आहे. त्यामुळे किमान लोकसभेची एक जागा ती सुद्धा हातकणंगलेची हवी, असा आग्रह सदाभाऊ खोत यांचा आहे. भाजपकडून मित्रपक्षांसाठी जागा सोडण्याबाबत बोलणी झालेली नाही. त्यामुळे सदाभाऊ नाराज असल्याचे समजते.
गेल्या तीन वर्षात मंत्री झाल्यावर या हातकणंगले मतदारसंघात अनेक विकास कामे मार्गी लावली. शेतक-यांच्या समस्या मार्गी लावल्या असल्याचा दावा खोत करत आहेत. शेतकरी संदर्भातल्या त्यांच्या चळवळीची सुरुवातही याच भागातून झाली आहे. शिवसेनेचे आमदार सोडले तर सेनेचे काहीही अस्तित्व नसल्याने हा मदतारसंघ आपल्याचा मिळावा, असा खोत यांचा हट्ट आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

