मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आज, मंगळवार ३ मार्चपासून राज्यात सुरुवात होणार असून, पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या या परीक्षेत १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी प्रविष्ट होतील.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल घटल्याने यंदापासून पुन्हा विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अकरा वाजेपर्यंत परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार असून परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहाणे आवश्यक आहे.
तसेच यंदाही ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध करुन दिल्याचे मंडळाने स्पष्ट केले. परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून राज्यभरात मिळून 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके ‘गैरमार्गाशी लढा’ या नावाने काम करणार आहेत. यामध्ये महिलांचे एक विशेष पथक काम करणार आहे.
दरम्यान, सर्व परीक्षा केंद्रांवरील तयारी पूर्ण झाली असून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी एकूण २७३ भरारी पथकांसह बैठे पथकाची आणि विशेष महिला भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र लाखबंद पाकीट पर्यवेक्षक परीक्षा कक्षातील दोन विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन उघडतील.


