टीम महाराष्ट्र देशा – राज्यात कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. या दरम्यान शासकीय पातळीवर रोज बैठका आणि निर्णय सुरु आहेत. सरकारकडून एकीकडे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असतानाच दुसरीकडे त्यांची गैरसोय टाळायची अशी कसरत सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जवळ जवळ रोजच फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधत आहेत. आज शुक्रवार २७ मार्च रात्रीही त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे.
आज बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानं २४ तास उघडी ठेवण्याचा निर्णय धाडसी असल्याचं सांगत जनतेला दुकानांमध्ये गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण करोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात आपण पोहोचलो असल्याचं सांगितलं. २४ तासं दुकानं सुरु ठेवणे हा आपल्या सरकारचा धाडसी निर्णय आहे. तुमच्या सर्वांच्या विश्वासावर हा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी शिस्त पाळली जात नाही आहे अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “संकटाच्या मागे हात धुवून लागायचं आहे. जीवनाश्यक वस्तूंची दुकान २४ तास सुरु राहणार आहेत हे वारंवार सांगत आहोत. काही ठिकाणी काहीही कारण नसताना झुंबड उडाल्याचं कळालं. आम्ही गर्दी करु नका असं आवाहन वारंवार करत आहोत”. “भाज्यांची वाहतूक सुरु आहे. लक्षात येत आहे त्याप्रमाणे सूचना देत आहोत. शेतीविषयक मजुरांची ये जा थांबता कामा नये. अन्नधान्य पुरवठा करणारी मालवाहतूक थांबवता येणार नाही. ती चालू आहे,” असं उद्दव ठाकरेंनी सांगितलं.
पण एका गोष्टीमुळे आपल्याला धक्का बसला. जिल्ह्यातील किंवा इतर राज्यातील माणसं ज्या पद्धतीने प्रवास करत आहेत ते पाहून आपल्याला धक्का बसला. लोक दुधाच्या टँकरमधून प्रवास करत असल्याचा प्रकार भयानक आहे. हे होता कामा नये असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. “काही राज्यांचे मुख्यमंत्री मला फोन करत आहेत. हे एक संकट आहे. जिथे आहात तिथेच थांबा असं आवाहन मी करत आहे. परराज्यातील कामगारांची जबाबदारीही राज्य सरकार घेत आहेत. काही संस्थांनाही आम्ही आवाहन करत आहोत. त्या संस्था पुढे येऊन जर त्यांची जबाबदारी घेणार असतील तर सरकारला फार मोठी मदत होईल,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
“महाराष्ट्रात जे इतर राज्यातील कामगार आहेत तिथेच थांबावं ही महाराष्ट्र सरकारची सूचना आहे. याशिवाय महाराष्ट्रातील जे इतर कामगार असतील त्यांची माहिती आपल्याकडे आहे. त्यांची व्यवस्था तिथे केली जात आहे. माणुसकी जपली पाहिजे. त्याचीच सध्या मदत होत आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. “मला शिर्डी साईमंदिर, सिद्धिविनायक आणि इतर संस्था ज्यांनी मदत केली आहे त्यांचे आभार मानतो. आपण करोना व्हायरसच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. आपण कल्पना करु शकत नाही इतक्या झपाट्याने तो पसरतो. आपल्याकडे रुग्ण वाढत असताना जी लोकं रुग्णालयात वेळेत दाखल झाली त्यापैकी काहीजण बरे होऊन घरी परतले आहेत ही दिलासा देणारी बातमी आहे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्यातील सर्व डॉक्टरांना दवाखाने बंद करु नका असं आवाहन केलं. “डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय कमाल करत आहेत. त्यांचे आभार कसे मानायचे कळत नाही. काही ठिकाणी अजूनही गर्दी दिसते. पोलिसांशी हुज्जत घातली जाते. ही सगळी माणसं आपल्यासाठी मेहनत घेत आहेत. पोलिसांच्या मुलांनाही त्यांच्या कुटुंबाची गरज आहे. पण हे सगळे आपल्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांच्यावर किती ताण द्यायचा. पोलीस केवळ चोरांपासून रक्षण करण्यासाठी नाही, तर न दिसणाऱ्या शत्रूपासूनही रक्षण करत आहेत. आपणही त्यांना मदत केली पाहिजे,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. राज्यातील शिवभोजन केंद्रांची क्षमता वाढवण्यास सांगण्यात आलं आहे. यामुळे तिथे गर्दी करु नका असंही मुख्यमंत्री म्हणाले.
घऱी काहीतरी मोठं संकट आहे अशी भीतीत बसू नका. घरातलं वातावरण आनंदी ठेवा. कुटुंबासोबत वेळ मिळत आहे. तो हसत खेळत घालवा. पण घराबाहेर पडू नका. घराबाहेर पडलात तर आभाळ कोसळेल. भीतीचं वातावरण आहे पण सर्व सूचना पाळा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. पुढचे १५ ते २० दिवस कसोटीचे आहेत. त्यानंतर आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. या परिस्थितीचा सामना हिंमतीने करत आहोत. ते पाहता संकट लवकर दूर होईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी व्यक्त केला.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

