पुणे- राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. सरकारनं लॉकडाऊन शिथील केल्यानंतर नागरिक बिनधास्त झाले. शिवाय सध्या कोणत्याही कोरोना नियमांचं पालन होताना दिसत नाही आहे. नागरिकांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळेच कोरोना संक्रमण पुन्हा वाढलं असल्याचं सांगितलं जातं आहे. पण राज्यातील कोरोना वाढीला फक्त सर्वसामान्यच नाही तर सर्वपक्षीय राजकारणी जबाबदार आहेत.
कोरोनाचे कारण सांगून आता पुन्हा निर्बंध लादण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. महाराष्ट्रात (19 फेब्रुवारी) निमित्त शिवजयंती चे हजारो कार्यक्रम होत असतात. शिवप्रेमी कार्यकर्ते शिवजयंतीच्या निमित्ताने प्रबोधनाचे हजारो कार्यक्रम आयोजित करतात. गावागावात व्याख्यान, पोवाडे, स्पर्धा, प्रबोधनाचे इतर कार्यक्रम हे लाखो रुपये खर्च करून आयोजित करतातम मात्र सरकारने अचानक शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याचा आदेश काढला आणि शिवभक्तांच्या आनंदावर विरजण पडले.
एका बाजूला प्राणाहून प्रिय असणाऱ्या शिवाजी महाराजांची जयंती उत्साहाला मुरड घालून साधेपणाने साजरी केली जात असताना दुसऱ्या बाजूला राजकीय पक्षांचे कार्यक्रम,सभा, आंदोलने,मेळावे हे धुमधडाक्यात सुरु असल्याचे चित्र आहे. यातच आता पुण्यात येत्या शनिवारी वशाटोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वशाटोत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीवर निर्बंध, अनेक ठिकाणी जमावबंदी आणि संचार बंदी लागू करण्याचे आदेश आहेत,पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात एकही नेता त्यांच्या घरी सांत्वनाला जात नाही. परंतु हे सर्व नियम सर्वसामान्यांना लागू आहेत का? असा प्रश्न पडत आहे. कारण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात वशाटोत्सवाचे आयोजन केले आहे आणि असं समजतंय की या कार्यक्रमाला पवार साहेब, संजय राऊतसाहेब ,धनंजय मुंडे आणि इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मग या उत्सवाला परवानगी कुणी दिली, या उत्सवामध्ये सुद्धा 100 जणांनी सहभागी व्हायचे, असे निर्बंध का नाही लादले? जसं दिल्लीत तबलिगी प्रकरण गाजले होते त्याची पुनरावृत्ती या गर्दीतून झाली तर मग कोण जबाबदार?… महाविकासआघाडीतील सत्ताधारी पक्षांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना वेगळे नियम लागू आहेत का आणि त्यांना सर्व सूट आहे का? याचे उत्तर या सर्व नेत्यांनी द्यावे असे त्यांनी म्हटले आहे.
तर दुसऱ्या बाजूला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी वशाटोत्सव आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रद्द करावे अशी मागणी केली आहे. खा.शरद पवार,खा.संजय राऊत, मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार असलेला चांदणी चौकातील (20 तारखेला) 1000 लोकांचा ‘वशाटोत्सव’ सुद्धा महाराष्ट्र सरकार व पुणे पोलिसांनी रद्द करावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे असे ते म्हणाले.त्या तिथे ठिकाणी सुद्धा हजारो लोक जमणार आहेत. जर शिवजयंती उत्सवाचे राज्यातील कार्यक्रम रद्द होत असतील तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व वशाट उत्सव आणि इतर कार्यक्रम सुद्धा इथून पुढच्या काळातील रद्द झाले पाहिजेत… अशी संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे असे ते म्हणाले.
एकीकडे कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारकडून केलं जात आहे. मग राष्ट्रवादीच्या वशाटोत्सवाला परवानगी कशी मिळाली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.फक्त सत्ताधारीच नव्हे तर विरोधक देखील या नियमांचे पालन करताना दिसून येत नसून ते देखील विविध ठिकाणी मेळावे,आंदोलने करत आहेत.माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस हे देखील जाहीर कार्यक्रमाना हजेरी लावताना दिसून येत आहेत तसेच गृहमंत्री अमित शाह हे तर बंगालमध्ये जाहीर सभा करत फिरत आहेत मग विरोधकांना तरी जाब विचारण्याचा अधिकार आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, वशाटोत्सवाला हजेरी लावण्यासाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते हजेरी लावतील असा अंदाज आहे. त्यामुळे जर याठिकाणी कुणाला कोरोनाची लागण झाली किंवा कुणी कोरोनाबाधित व्यक्ती यात सहभागी झाली तर त्याचा प्रसार आणखी वेगाने होईल ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.सर्वसामान्य जनता सरकार मायबाप सांगेल ते सर्व निमुटपणे ऐकत असते मात्र मायबाप सरकारनेच जर असा दुजाभाव करायचे ठरवले असेल तर जायचे कुणाकडे असा सवाल उपस्थित होतोय.
गोरगरिबांच्या मंगल कार्यक्रमावर,अंत्यविधीच्या कार्यक्रमावर सरकारने निर्बंध घातले आहेत ज्याचे पालन गरीब जनता करत आहे मात्र ज्या राजकीय कार्यक्रमांना हजारो लोक उपस्थित राहत आहेत त्यांना परवानगी राजकीय आश्रयामुळेच तर मिळत नाही ना असा सवाल देखील उपस्थित होत आहे.नेतेच जर नियम पाळत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी का नियम पाळावेत असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- तरुण शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धती स्विकारून शेतीत क्रांती घडवावी : रावसाहेब दानवे
- बाबा रामदेव यांचा रामबाण उपाय;तीन दिवसात कोरोनाचा रुग्ण बरा होण्याचा दावा
- ‘राजे’ तुमच्या विचारांचे पालन करणार, चिमुकल्यांचा शिवजयंती दिनी निर्धार
- पवार-मुश्रीफांना आज ज्या घोटाळा प्रकरणातून दिलासा मिळाला ते प्रकरण नेमके काय होते?
- यंदा आयपीएल ट्रॉफी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर जिंकणार मैक्सवेलने दाखवला विश्वास


