टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. एका बाजूला भाजपा आणि शिवसेनाने जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. तर याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी नतमस्तक होऊन शिवस्वराज्य यात्रेला प्रारंभ केला आहे. या यात्रेनिमित्त अमोल कोल्हे संपूर्ण राज्यात फिरणार आहेत. या यात्रेनिमित्त ते राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. याचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला विधानसभा निवडणुकीत नक्कीच होणार आहे.
शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी नतमस्तक होऊन @NCPspeaks च्या #शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात..@dhananjay_munde@Kolheamol @ChakankarSpeaks pic.twitter.com/pJopnJaOns
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 6, 2019
खासदार अमोल कोल्हे यांची लोकप्रियता पाहून राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्यावर शिवस्वराज्य यात्रेची जबाबदारी सोपवली आहे. या यात्रेद्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पुन्हा बळ आणण्यासाठी अमोल कोल्हे प्रयत्न करणार आहेत. तसेच सामान्य नागरिकांमध्ये खासकरून तरुणांमध्ये अमोल कोल्हे चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या या यात्रेचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला फायदा होणार आहे.
दरम्यान, शिवसेनेकडून ‘जन-आशीर्वाद’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेशी संवाद साधण्यासाठी ‘महाजनादेश यात्रे’वर आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची ही यात्रा असणार आहे.


