टीम महाराष्ट्र देशा- आ. शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा असताना आता शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. लोकसभेला प्रामाणिक कामे करून देखील आमच्यावर आरोप केले जात आहेत. पक्षात असून देखील जे पक्षाविरुद्ध काम करत आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. परंतु आमच्याबद्दल शंका कुशंका घेऊन आरोप केले जात आहेत, अशी खंत आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली.
वर्ये, ता. सातारा येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा तालुक्यातील लिंब, शेंद्रे, परळी आदी गटातून लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादीला 25 हजाराचे मताधिक्य दिले आहे. परंतु जावलीत माथाडींची संख्या जास्त असल्याने तेथील मतदान विभागले गेले. सातारा विधानसभा मतदारसंघाने लोकसभेला 42 हजारांहून अधिक मताधिक्य दिले आहे. तरी आमच्याबद्दल नाराजगी दिसत आहे याबद्दल भोसले यांनी खंत व्यक्त केली.


