मुंबई:- एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली.
शरजिल उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केली होती. यावरून आता भाजपने आक्रमक भूमिका घेत अजूनही राज्य सरकार व पोलीस कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान,भारतीय संघराज्य आणि न्यायपालीकेबाबत देखील त्याने अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली. यानंतर भाजपने तर आक्रमक भूमिका घेतलीच मात्र शिवसेना,कॉंग्रेस,राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील याबाबत कडक भूमिका घेत शरजीलचा निषेध केला आहे.भाजप,संघ,हिंदुत्ववादी संघटनांच्या चुकीच्या वर्तनावर जोरदार टीका करण्यात आल्याने या परिषदेवर या बाजूने टीका होणे स्वाभाविक होते मात्र संपूर्ण हिंदू समाजाचा,भारतीय संघराज्याचा,न्यायपालिकेचा अपमान करणाऱ्या उस्मानी विरोधात बहुतांश पक्ष एकमताचे असल्याचे दिसून येत आहे.यासर्व घडामोडीत या परिषदेचे आयोजक मात्र एकाकी पडल्याचे दिसून येत आहे.
यासंदर्भात ‘भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान’ या आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर न्या.कोळसे पाटील यांनी इंग्रजी आणि हिंदीमध्ये शनिवारी संध्याकाळी एक निवेदन दिलं. यामध्ये त्यांनी म्हटलं की, ३० जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी यानं दिलेलं भाषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि त्यांच्या संघ परिवाराकडून चुकीच्या पद्धतीनं दाखवलं जात आहे. शरजीलला लक्ष्य करुन संघ परिवाराने पुन्हा एकदा आपला धार्मिक विद्वेषाचा आणि जातीयवादी चेहरा दाखवून दिला आहे. शरजीलवर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आम्ही एल्गार परिषदेचे आयोजक शरजील उस्मानीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असं कोळसे पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
शरजील उस्मानी प्रकरणी भाजप सोडून विविध पक्षांच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया
अजित पवार
शरजीलने जे वक्तव्य केले ते चुकीचे आहे. त्याने तसे वक्तव्य करायला नको होते. आणि तेव्हा जे स्टेजवर होते त्यांनी ही त्याला थांबवायला पाहिजे होते. आता गुन्हे दाखल झाले आहेत. निश्चितच कारवाई होईल. आता पुढे परवानगी देताना सरकार म्हणून आम्ही विचार करू की, या व्यक्तीच्या वक्तव्यामुळे समाजात दुही निर्माण होते, म्हणून त्याला बोलू देता कामा नये, असे अजित पवार म्हणाले.
संजय राऊत
‘एल्गार वाल्यांची मानसिकता तपासण्याची आवश्यकता आहे.त्यांच्यामुळे राज्यात वातावरण बिघडत आहे. यापुढे त्यांना परवानगी देण्याबद्दल विचार करावा लागेल. एल्गार परिषदेत भडकाऊ भाषण करणारा शरजील उस्मानी ही घाण उत्तर प्रदेशातून आली असून योगी सरकारने आमच्या पोलिसांना सहकार्य करावं’
प्रकाश आंबेडकर
“त्यांचं जे भाषण आहे ते माझ्या समोर आलेलं नाही. मी एल्गार परिषदेला फारसं महत्वही देत नाही. ते भाषण पाहिल्या शिवाय मी त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. अगोदरच्या एल्गार परिषदेच्या हेतू वेगळा होता, ते समाजात एकोपा आणण्याचं काम होतं. मात्र त्यानंतर मी अध्यक्ष असताना एल्गार परिषद बरखास्त केली होती. आता उरलेल्या एल्गार परिषदेचा आमचा काही संबंध नाही.”
अनिल देशमुख
पुण्यात ३० तारखेला झालेल्या एल्गार परिषदेत शर्जील उस्मानी याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडिओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू.
उर्मिला मातोंडकर
‘मुळात शब्द हे जपून वापरावे लागतात, त्यामुळे मला असं वाटतं की शरजील नावाच्या इसमाने पुण्यामध्ये हिंदू धर्माच्याविरोधात जे काही शब्द वापरले, ते चुकीचे आणि दुर्दैवी होते. त्याबाबत पोलीस तपास जरुर व्हायला पाहिजे’.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीनंतर रिषभ पंतने केला ‘हा’ मोठा पराक्रम
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने आख्ख गाव गेलं वाहून; भारतीय क्रिकेटर्सनी केली प्रार्थना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

