🕒 1 min read
मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा भीषण अपघात होऊन त्यांचे निधन झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. विनायक मेटेंच्या निधनावर आता राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मेटेंच्या निधनाचे दुःख व्यक्त केले आहे.
“शरद पवार यांनी आताच विनायक मेटेंच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. “आजच्या दिवसाची सुरुवातच अतिशय धक्कादायक पद्धतीने झाली आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. एका लहानश्या गावात जन्माला येऊनही समाजासाठी ठाम भूमिका घेण्याचा निर्धार करून एखादी व्यक्त राज्यभर आपला प्रभाव कसा निर्माण करू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे विनायकराव मेटे होते. गेले अनेक वर्ष माझा आणि त्यांचा परिचय होता. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल अतिशय आस्था होती. गेल्या २०-२५ वर्षात मराठा आरक्षणासंदर्भात एक जनमत तयार करण्याचं काम त्यांनी केलं. तसेच हा प्रश्न राज्यकर्त्यांसमोर प्रभावीपणे मांडण्याचं कामही त्यांनी केलं.”
पुढे पवारांनी मेटेंच्या सुरुवातीच्या काळातील काही प्रसंग सांगितले. ते म्हणाले कि, “दिवंगत आर आर पाटील आणि विनायक मेटे यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यामुळेच त्यांच्या माध्यमातून आमच्याबरोबर काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पुढे महाराष्ट्राच्या विधिमंडळात राष्ट्रवादीचे आमदार म्हणून ते सहभागी झाले. पण नंतरच्या काळात मराठा आरक्षणाचा जास्त प्रश्न महत्वाचा आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळेच राजकारण बाजूला ठेवून आरक्षण आणि मुंबईच्या समुद्रात शिवछत्रपतींचे स्मारक व्हावे या भूमिकांचं व्रतच त्यांनी घेतले आणि त्यासाठीच अविरतपणे काम केले. त्यामुळेच मेटेंचं राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त लक्ष होतं.”
महत्वाच्या बातम्या:
- Nitin Gadkari | विनायक मेटे यांच्या निधनाने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय – नितीन गडकरी
- Pravin Darekar | मराठा समाजाची सर्वांगीण उन्नति पाहणारा नेता आज आपल्यामध्ये नाही – प्रवीण दरेकर
- chandrashekhar bawankule on vinayak mete | कालच आमचं बोलणं झालं, निधनाच्या बातमीवर विश्वासच बसत नाही- चंद्रशेखर बावनकुळे
- Vinayak Mete Accident | मेटेंचा अपघात की घातपात?, संपूर्ण अपघात प्रकरणाची चौकशी केली जाईल; शिंद-फडणवीसांचे आश्वासन
- Vinayak Mete: ‘मदत मागत होतो पण कोणी आलं नाही’; मेटेंच्या ड्रायव्हरचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

