टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देखील घोषित केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व उत्तम रित्या करू शकतात आणि जबाबदारी सांभाळू शकतात, असे सूचक विधान पवार यांनी केले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ९९व्या जयंती निमित्त सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना देखील टोला लगावला, विकासकामं होत नाही, असं सांगत काही नेते पक्ष सोडत आहेत. मात्र सत्ता असो वा नसो, कामं कशी करून घ्यायची हे राजकीय नेत्यांनी जयंत पाटील यांच्याकडून शिकलं पाहिजे. जयंत पाटील यांच्याप्रमाणे अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य प्रस्ताव केला तर नक्की विकासकामे मंजूर होतात. त्यासाठी सत्ता पाहिजेच असं नाही, असे पवार म्हणाले.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी पक्षात मोठी पडझड झाली आहे. तर अनेक नेत्यांनी खुंटलेल्या विकासाचा मुद्दा पुढे करत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकी पूर्वीचं राज्यातील अनेक जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, नवी मुंबईचे संदीप नाईक, चित्रा वाघ, वैभव पिचड, शिवेंद्रसिंहराजे भोसले आदी नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरकरून पक्षाला धोका दिला आहे.


