Share

खासदार उदयनराजेना अटक, नेमक काय घडलं 11 सप्टेंबर 1999 ला

Published On: 

🕒 1 min read

खा. श्री. उदयनराजेंना अटक व सुटका ही बातमी वाचली अन पोलीस अधीक्षक असतानाची मला ती सातारा मधील पहाट आठवली. 11 सप्टेंबर 1999 रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी देशभर खळबळ उडवून देणारी घटना घडली.
ती घटना माझे पुस्तक “नवी दिशा -पोलीस प्रशासनाची’ मध्ये सविस्तरपणे प्रकाशित झालेली आहे. तिचा आशय पुढील प्रमाणे…त्या पहाटे एक फिर्याद माझ्या हातात देण्यात आली. होती नव्हती ती झोप उडाली. नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाल्याचे व युती सरकारमधील एक राज्यमंत्री व छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज श्री उदयनराजे हे त्यात प्रमुख आरोपी दाखवले होते. एवढी मुद्देसूद, संक्षिप्त व परिपूर्ण फिर्याद मी उभ्या नोकरीत पहिली नाही. नंतर समजले की ती 11 वकिलांनी एकत्र बसून बनवली होती.
त्यानंतर बातमी मिळाली की श्री अभयसिंहराजे (श्री उदयनराजेंचे चुलते) यांच्या नेतृत्वाखाली हजारेक लोकांचा जमाव जमला असून आरोपी उदयनराजेंना अटक केली नाही तर सातारा पेटेल अशी धमकी दिली जात आहे. त्याच वेळी दुसरी बातमी धडकली कि राणी साहेब (श्री उदयनराजेंची आई) यांचेसोबत मोठा जमाव जमलाय व राजेंना अटक केली तर शहर पेटेल अशा घोषणा देतोय. प्रचंड तणाव वाढला. तीन तासानंतर मतदान सुरु होणार होते.

मोठीच गंभिर परिस्थिती होती. मग मी खुर्चीवर डोळे मिटून बसलो. शहर पटलेलं, लाठीमार, अश्रूधुर, गोळीबार… मग दंगलीची न्यायालयीन चौकशी।… त्या मध्ये मी पिंजऱ्यात उभा. तिथं पोलिसदल, सातारा पोलिस व माझा बचाव करतोय …हे डोळ्या पुढून सरकले ,आणि उत्तर सापडले! अटक केली तरी दंगल होणार, नाही केली तरी दंगल होणार. अटक करून दंगल झाली तर कायद्याचे पालन केल्याचे श्रेय मिळणार होते, नाही तर कर्तव्यच्युतीचा ठपका आला असता !

Dysp त्त्याल, इन्स्पेक्‍टर सुर्वेना सूचना दिल्या. उदयनराजे हजर झाले.”why have u called me here ? आल्याबरोबर त्यांनी प्रश्न केला. मी फिर्याद वाचून दाखवली. “हे सर्व साफ खोटं आहे एसपी साहेब. तुम्ही नवीन आहात. हे कुभांड माझे चुलते अभयसिंह राजेंनी रचलेले आहे. आमचा जुना वाद चालू आहे …वगैरे. “आम्ही गोळा केलेला पुरावा त्यांना सांगितला. झुंजूमुंजू होई पर्यंत वाद चालला. “मी निर्दोष आहे. “मी निघालो’असे ते म्हणाले.
मग मी बजावले “Mr Udayan Raje you cannot go, now you are under arrest !
त्यांना क्राईम ब्रॅंचमध्ये ठेवणात आले. राणी साहेब मोठा मोर्चा घेऊन आल्या. राणी साहेब फार कडक व आक्रमक स्वभावाच्या आहेत, अशी माहिती पुरविण्यात आली होती. राणी साहेबांची सर्व बाजू ऐकून घेतली. आमचे लोक बघून घेतील …वगैरे असा त्यांचा आक्रमक पवित्रा होता. मीही माझी बाजू सांगितली. तुमच्या लोकांनी गडबड केली तर ते गुन्हे तुम्ही व तुमच्या मुलाने घडविले असे आरोप होतील. तुमच्या अडचणी वाढतील तुमच्या लोकांना घरी जाऊन शांत रहायला सांगा. मधेच फोन वाजत होते. प्रदिर्घ चर्चेनंतर राणी साहेबांमधील एक आई जागृत झाल्याचे मला जाणवले.
पुन्हा फोन खणाणला. “मी महाराष्ट्राचा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतोय’ पलीकडून आवाज आला.
“गुड मॉर्निंग सर’ मी.
खोपडे तुम्ही उदयन राजेंना अटक केली हे खरे आहे का?
“होय सर” मी. “का?
फिर्यादीमध्ये त्यांचे नाव आहे त्या शिवाय ……..
“उद्या फिर्यादीमध्ये माझे नाव टाकले तर मलाही अटक करणार का?
शिवाय तीन प्रत्यक्ष साक्षीदार आहेत, हिंसक जमावामध्ये ते होते अशी आमची खात्री पटलेली आह. ………उद्या माझ्या विरुद्ध खोटे साक्षीदार उभे केले तर मलाही अटक करणार का? यू आर अल्व्हेज अगेन्स्ट मी अँड माय पार्टी ” (नांदेड एसपी असताना आमची वादावादी झाली होती. मुंडे साहेब हे खरे तर एक उमदा व मोठ्या मनाचा माणूस होते पण अधिकाऱ्यांशी वागण्याची त्यांची एक स्टाईल होती.

“खोपडे मला माहित आहे तुम्ही बारामतीचे आहात व राष्ट्रवादीचे बगलबच्चे आहात ‘ पलीकडून फोन आपटल्याचा आवाज आला. मीडिया, डिजिपी ऑफिस, राजकारणी यांचे फोन,राणी साहेब इतरांशी चर्चा चालू असता एक स्पेशल ड्युटी शिपाई कानाजवळ कुजबुजला.
“सर लोकांच्या मध्ये चर्चा आहे की राजाला दोन खून माफ असतात इथे तर एकच खून झालाय !
एव्हाना मतदान सुरु झाले होते. शरद लेवेंची प्रेत यात्रा दोन हजारावर लोकांसह तणावात सुरु झाली. स्मशानात जाण्याऐवजी प्रेत माझ्या कार्यालयाच्या दारात ठेवले. अभयसिह राजेंनी जमावापुढे भाषण केले की “मुख्य आरोपीला अद्याप अटक केलेली नाही व केली असल्यास आरोपीला बेड्या घातलेल्या अवस्थेत जमावाला दाखवा त्या शिवाय आम्ही प्रेत हलविणार नाही !”
मग मी जमावा पुढे भाषण केले.
“मुख्य आरोपीला आम्ही अटक केलेली आहे.पाच जणांचे शिष्टमंडल येऊन खात्री करू शकते.पण बेड्या घातलेल्या अवस्थेत आरोपीला दाखविण्याची प्रथा नाही व मी दाखवणार नाही’.
त्यावर अभयसिंह राजेनीं भाषण केले.
“बेड्या घातलेल्या अवस्थेत आरोपी दाखविल्याशिवाय आम्ही प्रेत हलविणार नाही. सुरेश खोपडे हे एसपी बीजेपी व शिवसेना धार्जिणे आहेत. आमचे सरकार आल्यावर त्यांच्याकडे बघून घेऊ !’
मतदान पार पडले. एक मंत्री व छत्रपतींचे वारसांना अटक करून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही हे पाहून युपी व बिहारच्या निवडणूक निरीक्षकांनी मला मिठी मारली. पण रात्रीच्या बातम्यात निवडणूक आयोगाने कलेक्‍टर सातारचे अभिनंदन केले .
युतीचा सरकार जाऊन आघाडीचे सरकार आले. आमच्या बारामतीचे श्री अजित पवार सातारचे पालकमंत्री बनले. सुरेश खोपडे हा शिवसेना बीजेपीचा माणूस आहे असे ठरवून निवडणुकी नंतर 3 महिन्यात व एकूण नोकरी 7 महिन्यात माझी सातारा मधून उचलबांगडी झाली. बदली का केली याचे उत्तर ना सरकाने दिले ना इलेक्‍शन कमिशनने!

सातारा पोलीस दलाने निरोप दिला. त्यातील दोन शेरे आजही लक्षात आहेत. एकजण म्हटला “साहेब दीड दिवस तुम्ही एकाच खुर्चीवर बसून होता पण तुम्ही एकदाही कुणावर रागावला नाही. दुसरा म्हणाला “एवढं काम केल्यावर तुमची बदली व्हायला नको होती. तरी पण एस पी ला पाठीचा कणा असतो हे तुम्ही दाखवून दिलेत. निवृत्ती वेतना इतकेच ते शेरे महत्वाचे वाटतात !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!