मुंबई : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर सडकून टीका करत एक प्रश्न उपस्थित केला आहे. आम्ही शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील आहोत की नाही हे विचारत दाखले मागणाऱ्यांनी शिकवू नये. त्यांनी आधी बाळासाहेब ठाकरे मोठे की छत्रपती शिवाजी महाराज हे सांगावं, असं मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
उदयनराजे भोसले म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पुढेही राहणार आहेत. पण माझा संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न आहे, की शिवाजी महाराज मोठे आहेत की बाळासाहेब ठाकरे? हा प्रश्न मला सर्वांनाच विचारायचा आहे. शिवसेना भवनावर महाराजांची प्रतिमा वर पाहिजे आणि मग खाली बाळासाहेब ठाकरे यांची पाहिजे. मग यावर कुणीच आजपर्यंत का आक्षेप घेतला नाही? यावर का कुणी विचारणा केली नाही. जर बाळासाहेब ठाकरे शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असतील तर त्यांनी शिवसेनेचं नाव बदलून ठाकरे सेना करावं. मी हे द्वेषापोटी म्हणत नसून तार्किक मुद्दा मांडत आहे. त्यामुळे माध्यमांनी जसा मला प्रश्न विचारताय तसा त्यांनाही विचारावा.”
सभापती व्यंकय्या नायडू यांनी जे राज्यघटनेत नाही त्यावर फक्त आक्षेप घेतला – उदयनराजे
यावर आता शिवसेना खासदार संजय राउत यांनी उदयनराजे भोसले यांना प्रत्युत्तर दिले आहे. खासदार उदयनराजे माझ्यावर टीका करतात. त्यांना लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. ते टीका करू शकतात. ते म्हणाले मी महान आहे. माझं मत आहे की, छत्रपती महान आहेत, आम्ही त्याचे मावळे आहोत, असं राऊत म्हणाले. तर व्यंकय्या नायडूंनी जे केलं के सभागृहाला अनुसरून केलं आहे. छत्रपतींबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या वैयक्तिक आहेत. छत्रपपतींच्या नावानं आम्ही उभे आहोत. आमची मनगटं बनली आहेत. सीमेवर जवान जेव्हा शत्रूंशी सामना करतात तेव्हा ‘जय भवानी, जय शिवाजी’ बोलतात याचा अर्थ यात किती ताकद आहे, हे सांगायला नको, असं ते म्हणाले. अस देखिल राउत म्हणाले आहेत.
‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा नियमभंग करणारी, घटनाबाह्य नाही. तर ती जय हिंद आणि वंदे मातरम एवढीच महत्त्वाची आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, उद्या जय हिंद, वंदे मातरमवर आक्षेप घ्याल का? जय भवानी, जय शिवाजी ही महाराष्ट्राची घोषणा आहे. हा महाराष्ट्राचा मंत्र आहे. शत्रूविरुद्ध लढताना चेतना जागविण्यासाठी सीमेवर भारतीय सैनिकही ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा देतात, असं राऊत म्हणाले. यापूर्वी सभागृहात शपथ घेताना "अल्ला हो अकबर"च्याही घोषणा दिल्या गेल्या आहेत. व्यंकय्या नायडू नियमानुसार बरोबर वागले असतील. तरी जनभावनांचा अवमान झाला आहे, असं राऊत म्हणाले. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं घोषणा दिल्या आहेत. हा वाद वाढू नये, नायडू हे वरिष्ठ आहेत, असं देखील राऊत म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

