पुणे : देशात व महाराष्ट्रात भाजपा व राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेले यश हे सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व व कर्तृत्वाचा विजय आहे. मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल व पारदर्शक कारभाराबद्दल जनतेला विश्वास वाटल्यानेच लोकसभा निवडणुकीत देशभरातील जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरभरून मतदान केले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज दिली.
‘लाव रे तो व्हिडिओ’ हा राज ठाकरेंचा डायलॉग या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रचंड प्रमाणात फेमस झाला होता. याविषयी बोलताना खासदार संजय काकडे म्हणाले की, राज ठाकरे यांनी तो व्हिडिओ आता घरातच लावावा व तो शरद पवारांना पाठवावा. त्यांनी असेच व्हिडिओ लावावेत. मात्र, जनता त्यांच्या खोट्या प्रचाराला भुलणार नाही.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीसाठी मजबूत पक्ष बांधणी केली. अनेक मातब्बर नेते भाजपामध्ये येण्यात फडणवीसांची भूमिका महत्वाची राहिली. याबरोबरच शिवसेनेबरोबरचे संबंध सुधारण्याबरोबरच ते अधिक मजबूत होण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. पंतप्रधान मोदी यांची लाट नव्हे तर, त्सुनामीच या निवडणुकीत पाहायला मिळाली. महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण संपुष्टात आले आहे. जनतेला या दोन्ही पक्षांविषयी आपलेपणा व विश्वास राहिला नाही, असेही खासदार काकडे म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

