लातूर: लातुरात सातत्याने दुष्काळ निर्माण होत आहे. लातूरसाठी शाश्वत पाण्याचा स्रोत असणे आवश्यक आहे. उजनी धरणातील पाणी आले तरच लातूरसाठी शाश्वत पाण्याचा स्रोत निर्माण होणार आहे. आगामी दोन वर्षांत उजनी’चे पाणी लातूरला आणणारच, उजनी’चे पाणी नाही आले तर आपण आहे त्या पदाचा राजीनामा देऊन आयुष्यभर पाण्यासाठी संघर्ष करीन, अशी माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
लातूरची भौगोलिक रचना वेगळी आहे. अवर्षणग्रस्त भागात लातूर येते. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडत नाही. धरणात पाणी येत नसल्याने त्याचा परिणाम लातूर शहराला सातत्याने टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मराठवाड्यात सर्वांत जास्त टंचाई लातूरमध्ये जाणवते. यातून गेल्या दोन वर्षांपासून लातूरच्या संदर्भात नकारात्मक प्रसिद्धी जास्त मिळत आहे. लातूरच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न; तसेच विकासासाठी शाश्वत पाण्याचा स्रोत असणे अत्यंत आवश्यक बनले आहे, अशी माहिती निलंगेकर यांनी दिली.
मराठवाडा वॉटरग्रीड ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. यात पहिल्या टप्प्यात औरंगाबाद आणि जालना हे दोन जिल्हे घेण्यात आले होते; पण यावर्षीही लातूरच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ही बाब मंत्रिमंडळाच्या बैठकीत लक्षात आणून देण्यात आली. त्यामुळे मराठवाडा वॉटरग्रीडमध्ये लातूर व उस्मानाबादचा समावेश करण्यात आला. यात लातूरसाठी 1 हजार 713 कोटी, तर उस्मानाबादकरिता 1 हजार 409 कोटी रुपयांच्या निधीलाही मान्यता घेण्यात आली. या योजनेमुळे दोन्ही जिल्ह्यांचा कायापालट होणार आहे, अशी माहिती निलंगेकर यांनी दिली.
टंचाईमुळे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तर शेतकऱ्यांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे दोन्ही प्रश्न सुटण्यासाठी उजनी धरणाचे पाणी हे शाश्वत असणार आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत उजनी’चे पाणी लातूरला आणणारच, उजनीचे पाणी नाही आले तर आपण आहे त्या पदाचा राजीनामा देऊन आयुष्यभर पाण्यासाठी संघर्ष करीन, असे मतही निलंगेकर यांनी व्यक्त केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

