औरंगाबाद : सध्या जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. कोरोना रुग्णांसह इतर रुग्ण सुद्धा घाटी रुग्णालयात उपचारासाठी भरती होत असतात. अनेकवेळा कर्मचारी वेळेवर सर्वच रुग्णांकडे पोहोचू न शकल्याने रुग्णांची गैरसोय होते, अशातच घाटीतील दोन फोटो व्हायरल होत आहेत. ज्यात रुग्णांच्या नातेवाईकांच्या हातात सलाईन दिसत आहे. घाटी रुग्णालयात कर्मचारी तसेच सुविधांचा तुटवडा आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो.
रुग्णांच्या नातेवाईकांनी हातात सलाईन धरलेला फोटो सोशल मिडियावर गुरुवारी व्हायरल झाला. घाटी रुग्णालयातील वार्ड क्र. १४-१५ मध्ये एका रुग्णाला लावलेली सलाईन एक तरुणी हातात धरून उभी होती, त्याच सोबत रुग्णालयाच्या आवारात बसलेल्या एका रुग्णाची सलाईनची बाटली एका महिलेने धरलेला फोटो व्हायरल झाला आहे. सोशल मिडियावर हे फोटो शेअर करून त्या सोबत ‘घाटीत औरांगाबादसह मराठवाड्यातील रुग्ण उपचारासाठी येतात, मात्र घाटी रुग्णालयात सुविधांची वानवा पहायला मिळतेय’ असा मजकूर सुद्धा व्हायरल होत आहे.
हा सगळा प्रकार घाटी रुग्णालयाच्या निदर्शनास आला तेव्हा सलाईन स्टँड आणेपर्यंतच नातेवाईकांनी सलाईन हातात धरला होता, असे उत्तर मिळाले. घाटीतील वार्ड क्र.१४-१५ मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला सलाईन लावण्यासाठी परिचारिका स्टँड आणायला गेली, त्यावेळी ती सलाईन रुग्णांच्या नातेवाईकांकडे काही मिनिटांसाठी देण्यात आली. तोपर्यंत कोणीतरी फोटो काढून तो सोशल मिडियावर टाकला. अर्थात नातेवाईकांनी मदत म्हणून ती कृती केली.
दुसऱ्या फोटोत रुग्ण सोनोग्राफी किंवा एक्स-रेसाठी जात असेल व रुग्ण गंभीर असेल तर आपण चाकाची खुर्ची पाठवतो, परंतू रुग्ण गंभीर नसेल तर त्याला तसेच नेले जाते. अशात तपासणीसाठी जाताना सलाईन बंद न होण्यासाठी ते हातात घेऊन नेण्याची वेळ येऊ शकते, असे स्पष्टीकरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
- दागिने बनविणाऱ्या बंगाली कारागिरांनी लांबवले ७७ तोळ्यांचे दागीने
- योगीजींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश निरंतर प्रगतीपथावर राहून ‘सर्वोत्तम प्रदेश’ बनावा – नाईक
- मुंबईत आज पासूनच कडक निर्बंध लागू होऊ शकतात – महापौर किशोरी पेडणेकर
- सचिन वाझे आणि हिरेन यांचे ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- कर्नाटकने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना बंदी घातली


