टीम महाराष्ट्र देशा : माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आता नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून पाच फेब्रुवारीपासून सदाभाऊ महाराष्ट्रचा दौरा करणार आहे. तसेच नव्या पक्षाचा झेंडा आणि नाव जनतेतून आलं पाहिजे, म्हणूनच लोकांना नाव आणि झेंडा सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला सुचवावं, असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी समर्थकांना केलं. नवीन पक्षाचं एप्रिलमध्ये पहिले अधिवेशन घेतलं जाणार आहे अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हा पक्ष सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी काम करेल. फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी वंचित राहिला. आताच असो किंवा आधीच सरकार, शेतकरी कर्जमाफी देताना निकष न लावता कर्जमाफी केली पाहिजे होती, असं मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं. तसेच आपल्या पक्षात राजकारणापासून अलिप्त असलेले आणि सज्जन लोकांना पक्षात सामावून घेऊ असाही खोत म्हणाले.
निवडणुकीच्या काळात उमेदवार जे आश्वासन देतात ती शपथपत्र म्हणून घेतली पाहिजे. त्यांनी दिलेलं आश्वासन निवडून आल्यावर तीन महिन्यात पाळलं नाही, तर त्याच पद काढून घेण्यात यावं अशी भूमिका निवडणूक आयोगाने घ्यावी अशी मागणीही सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.
औरंगाबाद येथे रयत क्रांती संघटनेचा निर्धार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात संघटनेची नव्याने उभारणी आणि त्याची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली . आता आपल्याला संधी असल्याच यावेळी सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. आज शरद जोशी यांची शेतकरी संघटना सोडली. तर शेतकऱ्यांसाठी झटणारे सर्व सत्ताधाऱ्यांसोबत गेल्याने रस्त्यावर उतरणारे आपण एकटेच असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. आज आपल्यासोबत काम करणारा वर्ग शेतकरी आहे. दिवसभर काम केल्यावर आता रात्री आपल्या संघटनेसाठी काम करा. झेंडा आपला घ्या आणि त्याची काठी मात्र शेतकऱ्यांची घ्या. आपला प्रचार आणि प्रसार करा, असं आवाहन खोत यांनी पदाधिकाऱ्यांना केलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

