मुंबई : देशात सध्या कोरोनाचे संकट मानवी जीवनाचा घास गिळत असताना दिल्लीतील राज्यकर्त्या पक्षाला विरोधकांची सरकारे पाडण्याची थेरं सुचावीत हे धक्कादायक आहे. विरोधी पक्षाची सरकारे दोन-चार राज्यांत राहिली तर देशावर असे काय आभाळ कोसळणार आहे ? असा घणाघात शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामना दैनिकातून सत्ताधारी भाजपवर करण्यात आला आहे.
वाचा आजचा सामना संपादकीय
देशात सध्या कोरोनाचे संकट मानवी जीवनाचा घास गिळत असताना दिल्लीतील राज्यकर्त्या पक्षाला विरोधकांची सरकारे पाडण्याची थेरं सुचावीत हे धक्कादायक आहे. देशात एकाच दिवशी 10 हजार कोरोना रुग्ण व्हावेत यावर केंद्रीय सरकार चिंता करायला तयार नाही. महाराष्ट्रात तुफानी वादळाने कोकण किनारपट्टीवर लोकांचे अतोनात नुकसान झाले. या संकटात केंद्रीय मदतीचा हात अद्यापि पोहोचलेला दिसत नाही, पण विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी मात्र निधी व पथके पोहोचत आहेत. संकटाचे रूपांतर संधीत करण्याची हीच ‘योग्य’ वेळ असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात सांगितले. त्यांच्या भक्तांनी ‘मोदी उवाच’चा अनर्थ केला. मोदी यांनी या संधीसाधूंची एकदा शाळा घ्यावी हेच बरे!
संकटाचे रूपांतर संधीत करण्याची हीच ‘योग्य’ वेळ असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. हे संकट म्हणजे कोरोना व संधी म्हणजे स्वावलंबन असे आमच्यासारख्यांना उगाच वाटत होते. पंतप्रधानांच्या सांगण्याचा खरा अर्थ भाजपातील नेत्यांनी समजून घेतला आहे व कोरोनाचे संकट हीच संधी मानून राजस्थानमधील स्थिर सरकारचे पाय ओढायला सुरुवात केली आहे. ज्या पद्धतीने मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडले त्याच प्रकारे राजस्थानमधील गेहलोत सरकार पाडण्यासाठी तेथे भाजप सुरुंग लावत असल्याचे धक्के आता जाणवू लागले आहेत. कोरोना संकटाशी युद्ध सुरू झाले असतानाच भाजपने ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे बावीस आमदार फोडले व संकटातील संधीचे सोने करून दाखवले! या बदल्यात शिंदे समर्थकांना काही फुटकळ मंत्रीपदे मिळाली. स्वत: शिंदे यांना केंद्रात मंत्रीपदाचे गाजर दाखवण्यात आले, पण कोरोना संकटामुळे ही गाजराची शेती सुकली असून स्वत: शिंदे महाराज हे कोरोनाग्रस्त होऊन दिल्लीतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता या गाजरांचा साठा राजस्थानात पाठवला आहे व तेथे संधीचे सोने करण्याचे पीक निघेल काय यासाठी पेरणी आणि खतांची फवारणीही सुरू झाली आहे. काँग्रेस आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांना विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची लालूच दाखविण्यात आल्याचा आरोप स्वत: मुख्यमंत्री अशोक गेहलोत करीत आहेत. तशी तक्रार काँग्रेसने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. हे सर्व राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने घडवले जात आहे.
अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांनी पुढे यावे – उद्धव ठाकरे
राजस्थानातील राज्यसभेचा एक काँग्रेस उमेदवार पाडायचा व पुढे सरकार पाडायचे असे एकंदरीत मनसुबे दिसतात. मध्य प्रदेशात शिंदे महाराजांचे ऑपरेशन झाले तसे राजस्थानात सचिन पायलट यांचे होणार काय? सचिन पायलट हे दिल्लीत गुप्तपणे येऊन भाजपच्या ‘सर्जन’ मंडळींना भेटले व पोटात दुखणाऱ्या अपेंडिक्सवर चर्चा केली अशा बातम्या बाहेर उडत आहेत. त्या अफवा असतीलही, पण त्यामुळे काँग्रेसच्या पोटात नक्कीच गोळा आला. आधीच दुष्काळ, त्यात तेरावा महिना असा हा प्रकार ठरेल. सचिन पायलट हे नाराज आहेत असे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले, पण हातचे सोडून पळत्याच्या मागे लागून त्यांचे असे काय राजकीय भले होणार आहे? राजकारणातील दुनिया मतलबी असते याचा अनुभव स्वत: मध्य प्रदेशचे शिंदे महाराज घेत आहेत. विरोधकांची सरकारे पाडायचीच, पण जेथे भाजप सत्तेत आहे तिथला विरोधी पक्षही फोडायचा. गुजरातमध्ये राज्यसभा जिंकण्यासाठी काँग्रेसचे आमदार त्याच हव्यासातून फोडले गेले. हे लोकशाही परंपरेला मारक आहे.
कमलनाथ सरकार पाडण्याचा आदेश आम्हाला वरून आला. त्यामुळे मध्य प्रदेशातील सरकार पाडले, असा स्फोट आता मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी करावा यातच सर्व आले. वरच्यांनी खाली सांगितले व खालच्यांनी वरच्यांच्या मदतीने संकटातील संधीचे ‘सोने’ केले. महाराष्ट्रातही असे राजकीय संकट निर्माण करून राज्य स्थापन करण्याचा प्रयोग सहा महिन्यांपूर्वी झाला, पण संधीचा तो प्रयोग कोसळला. देशात सध्या कोरोनाचे संकट मानवी जीवनाचा घास गिळत असताना दिल्लीतील राज्यकर्त्या पक्षाला विरोधकांची सरकारे पाडण्याची थेरं सुचावीत हे धक्कादायक आहे. विरोधी पक्षाची सरकारे दोन-चार राज्यांत राहिली तर देशावर असे काय आभाळ कोसळणार आहे? ही सरकारे लोकशाही मार्गाने निवडून आली आहेत. भले सरकार बनविण्यासाठी त्यांनीही आपल्या पद्धतीने जमवाजमव केली असेल, मग हीच जमवाजमव भाजपने हरयाणा, मणिपूर, गोव्यात आणि कर्नाटकातही केलीच व मध्य प्रदेशातही राजकीय चिखल करूनच त्यात सत्तेचे कमळ फुलवले. राज्य सरकारे कोरोना संकटाशी लढा देत असताना त्या विपरीत परिस्थितीचा गैरफायदा घेत विरोधी सरकारचे नटबोल्ट उखडायचे हे प्रकार अघोरी आहेत. देशात एकाच दिवशी 10 हजार कोरोना रुग्ण व्हावेत यावर केंद्रीय सरकार चिंता करायला तयार नाही. अनेक राज्यांत संकटकाळी केंद्राची मदत पोहोचू शकलेली नाही. महाराष्ट्रात तुफानी वादळाने कोकण किनारपट्टीवर लोकांचे अतोनात नुकसान झाले. या संकटात केंद्रीय मदतीचा हात अद्यापि पोहोचलेला दिसत नाही, पण विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी मात्र निधी व पथके पोहोचत आहेत. संकटाचे रूपांतर संधीत करण्याची हीच ‘योग्य’ वेळ असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात सांगितले. त्यांच्या भक्तांनी ‘मोदी उवाच’चा अनर्थ केला. मोदी यांनी या संधीसाधूंची एकदा शाळा घ्यावी हेच बरे!
शेवटी बहिणीची माया : भाऊ काळजी घे, पंकजा मुंडेंनी केला धनंजय मुंडेंना फोन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

