टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारित कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र ‘बंद’चं आवाहन केलं आहे. यामध्ये बसेस, एसटी बाहेर पडल्या नाहीत, कुलाबा, भायखळा, हाजीअली बंद आहे. जवळपास ९० टक्के बंद यशस्वी सुरु आहे असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
ते एका मराठी वृत्तवाहिनीला याबाबत मुलाखत देताना बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला बंद हा शांततेच्या मार्गाने पुकारलेला आहे. या बंदला काही लोक जाणीवपूर्वक हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू मुसलमान दंगल घडवण्याचा संघाचा डाव आहे असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत. बंदच्या दरम्यान काही लोक चेहरा लपवून बंदला हिंसक वळण लावत आहेत. त्यांना पोलिसांनी शोधून काढावं असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केले.
दरम्यान, या बंदमध्ये सुमारे २५ ते ३० संघटना सहभागी होतील असा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. आमचा बंद शांततेच्या मार्गाने सुरु आहे. आम्हाला तोडफोड करायची असती तर त्याची सुरुवातच हिंसक केली असती. मात्र आम्हाला तसं काहीही करायचं नाही,’ असेही यावेळी ते म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
