मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात एका अट्टल दरोडेखोराला अटक करण्यात आलं आहे. मातोश्रीच्या शंभर मीटर परिसरातून आरोपी इर्शाद खानला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून काही शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. यात एक पिस्तुल आणि 4 राऊंडचा समावेश आहे. गुन्हे शाखेचं युनिट 9 ने ही कारवाई केली.
हा तरुण दरोड्याच्या उद्देशाने बांद्र्याच्या कलानगरमध्ये आला होता. मातोश्री बंगल्याच्या परिसरात तो आला होता. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती दिली जात आहे. कलानगच्या परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले काही जण येणार आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
मातोश्रीजवळील हायवेवर खेरवाडी जंक्शन परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मातोश्रीपासूनच काही अंतरावर त्याला अटक झाल्याने मोठी खळबळ माजली आहे.
दरम्यान, आरोपी इर्शाद खानवर मुंबईसह गुजरातमध्ये हत्या, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्याने स्वत: जवळ बंदूक का बाळगली होती, याची चौकशी पोलीस करत आहेत.


