टीम महाराष्ट्र देशा : सातारा लोकसभेचे प्रतिनिधी बदलल्याने माझी अडचण झाली आहे. कारण पूर्वीचे लोकसभेचे प्रतिनिधी विकास निधीसाठी कधीच आग्रह धरत नव्हते, त्यामुळे तो निधीही मलाच मिळत होता. मात्र, सध्याचे लोकप्रतिनिधी श्रीनिवास पाटील हे सर्व माहिती असणारे लोकप्रतिनिधी आहेत.त्यामुळे पूर्वीसारखा आता निधी मला मिळणार नाही,” असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केले. पाटील यांची स्तुती करतानाच सौ. सुळे यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता त्यांना टोलाही लगावला.
खंडाळा तालुका मराठी पत्रकार संघ व खंडाळा पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने खंडाळा येथे पंचायत समितीच्या सभागृहात पत्रकार दिन, राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार व जीवन गौरव पुरस्कार वितरण तसेच गुणवंत कर्मचारी यांचा सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.
सातारा जिल्हा हे पवार साहेबांचे टॉनिक आहे. महाराष्ट्राच्या जनतेने पवार साहेबांवर भरभरून प्रेम केले. या प्रेमाच्या नात्याला, विश्वासाला तडा जाता कामा नये. यशवंतराव चव्हाण साहेबांचे आपल्या सर्वांवर संस्कार आहेत. आपले महाआघाडीचे सरकार नवीन ऊर्जेनं , विश्वासाने राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करेल. महिला, अंगणवाडी सेविका, आशा ताई, बचतगट यांचे सगळे प्रश्न प्राधान्य देवून सोडविले जातील. अस देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

