मुंबई : फ्रान्समधून पाच राफेल भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. जगातील आधुनिक विमानांमध्ये राफेलचा समावेश होतो. ही विमानं अंबाला येथे उतरल्यानंतर युद्धसज्ज ठेवली जाणार आहेत. राफेल विमानांसाठी वैमानिक तसेच ग्राउंड स्टाफचे तांत्रिक प्रशिक्षण झाले आहे.प्रशिक्षित टीम अंबालामध्ये विमानांचा ताबा घेणार आहे.
ही पाच विमाने सात हजार किलोमीटरचा प्रवास करून आज भारतात पोहोचतील. अंबाला येथील भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात या राफेल विमानांचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी अंबाला हवाईतळही राफेल विमानांच्या स्वागतासाठी पूर्णपणे तयार आहे.
भारतानं ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनशी करार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ राफेल विमानं भारताला मिळाली आहेत. राफेल विमानांच्या पार्श्वभूमीवर अंबाला हवाई तळासाठी सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. तसेच, अंबाला हवाईतळाजवळील ३ किलोमीटरच्या परिसराला ड्रोन झोन घोषित करण्यात आले आहे. ३ किलोमीटरच्या आत ड्रोनवर पूर्णपणे बंदी घातली जाईल. जर कोणी त्याचे उल्लंघन केले तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार याचं थोडं वेगळेच मत पाहायला मिळाले. सीएनएन न्यूज १८ दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हणाले की, भारतानं हवाई दलात राफेल विमानं सामिल केली ही नक्कीच चांगली बाब आहे. राफेलच्या ताफ्यात सामिल होण्यानं नक्कीच हवाई दलाची ताकद वाढेल. पण ते गेमचेंजर ठरणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
राफेलच्या हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होण्यानं चीनची चिंता वाढेल, असं वाटत नसल्याचं मत देखील शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.राफेलच्या येण्यानं चीनला कदाचित कोणतीही काळजी वाटणार नाही. ते आपल्यापासून खुप म्हणजे खुपच पुढच्या टप्प्यावर आहेत. आपल्यात आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारची तुलना करता येणार नाही, असं शरद पवार यांनी सांगितले. तसेच भारतानं सुरक्षेच्या दृष्टीनं १० गोष्टी केल्या तर चीन १ हजार गोष्टी करेल. चीन आणि भारतात एवढी तफावात आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
आता ‘या’साठी बँकाची वेळ सकाळी १० ते सांयकाळी ६
आळींबी प्रक्रिया उद्योग इतर शेतकऱ्यांस प्रेरणादायी ठरेल – कृषीमंत्री दादाजी भुसे
गणेशोत्सव : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गणेशोत्सव मंडळांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
