अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : विधानसभा निवडणुकीला एक वर्ष झाले आहे. वर्षापूर्वी कर्जत-जामखेड मधील मतदारांनी पवार कुटुंबीयांवर विश्वास ठेवून आमदार रोहित पवार यांना निवडून दिले. गेल्या वर्षभरात या मतदारसंघातील मतदारांनी आपले सर्वस्व गमावले आहे. विद्यमान आमदारांनी निवडून आल्यापासून उल्लेख करावा असे एकही भरीव काम केले नाही. उलट बारामती भागातील आपल्या कंपन्या व संस्थांच्या वस्तू येथे आणून विकण्याचा व्यापारच वाढविला अशी घणाघाती टीका भाजप नेते व माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी आ.रोहित पवार यांच्यावर केली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभव प्रा.शिंदे यांच्या फार जिव्हारी लागला होता. काल या निकालाला एक वर्ष पूर्ण होत असताना प्रा.शिंदे यांनी कर्जतमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना लक्ष्य केले.
प्रा.शिंदे पुढे म्हणाले की, माझ्या काळात मंजूर झालेल्या कामांतही आ.पवार यांनी खोडा घालण्याचे काम केले. त्यामुळे हा भाग विकासापासून मागे खेचला गेला आहे. निवडणुकीत जाहीर केलेले बारामती पॅटर्न आणि नवे पर्व कोठेच दिसत नाही. पवार कुटुंबीयांना पन्नास वर्षांच्या कामाचा वारसा असल्याचे सांगतात, पण येथे तो दिसून येत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची कामे करण्याचे कर्तव्य असते, हे लक्षात ठेवले पाहिजे. उलट येथील लोकांना अपमानीत व्हावे लागत आहे.
व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले, असेच पवार यांच्या बाबतीत म्हटले पाहिजे. येथे सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी बारामती भागातील कंपन्या आणि संस्थांचा विविध प्रकारचा माल येथे आणून विकण्यास सुरुवात केली आहे. कोंबड्यांची पिल्ले, पिठाच्या गिरण्या, स्वत:च्या नावाचे मास्क, झाडांची रोपे, माशांची बिजे अशा अनेक वस्तू येथे आणून विकल्या जात आहेत, असेही प्रा.शिंदे यांनी म्हटले आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष डॉ.सुनील गावडे, नगरसेविका राखी शहा, काका धांडे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत आणखी वाढ ! अजून एक तक्रार दाखल
- महिला अपक्ष आमदार करणार शिवसेनेत प्रवेश,भाजपला आणखी एक धक्का
- कौतुक तर व्हायलाच पाहिजे ! भारतीय नौदलात महिला वैमानिकांची पहिली तुकडी कार्यरत
- ‘राष्ट्रवादी सर्व भ्रष्ट नेत्यासाठीचे माहेरघर, त्यामुळे खडसेंचा पक्ष प्रवेश आश्चर्यकारक नाही’
- ‘अनिल देशमुख यांनी ‘तो’ निर्णय जाहीर केल्यानंतर भाजपाच्या पोटात गोळा उठला आहे’


