टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील राज्यसभेच्या १९ पैकी ७ जागा २ एप्रिल २०२० ला रिक्त होत आहेत. या रिक्त होणाऱ्या जागांवर लवकरच निवडणूका जाहीर होऊ शकतात. रिक्त होणाऱ्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार आणि माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत तर भाजपचे रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे यांचा समावेश आहे.
राज्यातील विधानसभेतील महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहिलं तर सात पैकी चार खासदार त्यांचे निवडून येऊ शकतात. यातील राष्ट्रवादीला दोन खासदार, शिवसेनेला एक, काँग्रेसला एक असे वाटप होईल असं मानलं जातंय. या निवडणूकीत शिवसेनेच्या मदतीच्या बदल्यात पुढच्या वेळी त्यांना वाढीव जागा देऊन भरपाई केली जाऊ शकते अशी शक्यता आहे.
राज्यात महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर आघाडीची एकत्र राजकीय ताकद वाढली आहे. निवृत्त सदस्यांपैकी शरद पवार आणि रामदास आठवले यांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लागणार हे नक्की मानलं जातंय.
मात्र इतर जागांवर कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले, किरीट सोमय्या, विजया रहाटकर, हंसराज अहिर अशी नावे चर्चेत आहेत. तसेच भाजपचे खासदार संजय काकडे यांच्या भूमिकेबाबतही अजून सस्पेन्स कायम आहे. तर काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे यांना यावेळी संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रावादीकडूनही दुसऱ्या जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

